For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मायकल स्मिथची पाकच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती

06:34 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
मायकल स्मिथची पाकच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक मायकल स्मिथ यांची पुऊष राष्ट्रीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अधिकृतपणे नियुक्ती केली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मंगळवारी या नियुक्तीला दुजोरा दिला.

Advertisement

46 वर्षीय स्मिथ यांना दोन वर्षांचा करार देण्यात आला असून ते पाकिस्तानच्या कसोटी आणि एकदिवसीय व टी-20 अशा दोन्ही प्रकारांमधील फलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. 19 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविऊद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी स्मिथ आपला कार्यभार स्वीकारतील.

‘श्रेणी 4’ पात्रताधारक प्रशिक्षक असलेल्या स्मिथ यांनी खेळाडू म्हणून 2003 ते 2013 अशी एक दशकाची कारकीर्द गाजवली. यात ते 89 प्रथम श्रेणी सामने, 72  ‘अ’ श्रेणी सामने आणि 16 टी-20 सामने खेळले. त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड, कराची किंग्स आणि मुल्तान सुलतान्स या संघांसोबत काम केले आहे. त्यांच्या प्रशिक्षणाच्या अनुभवात ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट हरिकेन्स आणि क्रिकेट टास्मानियासोबत फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा समावेश आहे. तसेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या ‘केझेडएन इनलँड’ आणि ‘ईस्टर्न प्रोव्हिन्स’साठी प्रशिक्षक सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

Advertisement

स्मिथ यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा पाकिस्तान आपल्या फलंदाजीतील वारंवार येणाऱ्या अपयशावर उपाय शोधत आहे. अलीकडच्या काळात त्यांच्या राष्ट्रीय संघाकडे पूर्णवेळ फलंदाजी प्रशिक्षक नव्हता आणि राष्ट्रीय निवड समितीतील असद शफीक अधूनमधून ही भूमिका बजावत होते. दरम्यान, माजी वेगवान गोलंदाज उमर गुल संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे. आयसीसी जागतिक कसोटी स्पर्धेच्या गुणतालिकेत पाकिस्तान सध्या नवव्या स्थानावर आहे.

पाकिस्तान सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत 90 धावांनी पराभव झाल्यामुळे ते सध्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहेत. अलीकडच्या वर्षांत पाकिस्तानची कमकुवत फलंदाजी ही एक सततची चिंतेची बाब बनली आहे. सामन्यात मजबूत स्थितीत असूनही त्याचा पुरेसा फायदा घेता न आल्याने कसोटी क्रिकेटमधील त्यांची कामगिरी खालावली आहे. गेल्या 17 कसोटी सामन्यांपैकी 13 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

Advertisement
Tags :

.