आता ,दहशतवाद संपला का ?
मायकल डिसोझांचा मंत्री केसरकरांना सवाल
सावंतवाडी। प्रतिनिधी
सावंतवाडीकरांना नारायण राणे व दीपक केसरकर यांना एकत्र बघून आश्चर्य वाटलं. दहशतवादाची सुरुवात जिथून झाली तिथे दोघे एकत्र आले. त्यामुळे केसरकरांनी राणेंच्या दहशतवादाच्या लोकांना व आम्हाला सांगितलेल्या कहाण्या खऱ्या की खोट्या हे केसरकर यांनी जनतेसमोर जाहीर करावे असे आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी तालुका संघटक मायकल डिसोझा ,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिले या. तर नारायण राणेंना मागचा अनुभव पाहता आता केसरकरांच्या भुलथापांना राणेंनी बळी पडू नये असं मत ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी व्यक्त केले.
मायकल डिसोझा म्हणाले, सावंतवाडीकरांना नारायण राणे व दीपक केसरकर यांना एकत्र बघून आश्चर्य वाटलं. दहशतवादाची सुरुवात जिथून झाली तिथे दोघे एकत्र आले. त्यामुळे दहशतवाद संपला का ? असा प्रश्न आम्हाला पडू लागला आहे. नारायण राणेंबद्दल जे दीपक केसरकर बोललेत ते सर्वश्रुत आहे. भविष्यात आपला राजकीय बळी जाऊ शकतो आपल्या परिवाराला धोका आहे असं केसरकर सांगत होते. दहशतवादाचे हे सोंग केसरकरांनी घेतलं होतं का ? की दहशतवाद संपला हे दीपक केसरकर यांनी जाहीर कराव असं आव्हान माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी दिला. परिवाराला धोका आहे असं केसरकर सांगत होते. मग, आता धोका संपला का ते देखील जाहीर करावं अस ते म्हणाले.
दरम्यान, दीपक केसरकर राणेंना मताधिक्य देण्याची भाषा करत आहेत. ते कुठल्या जोरावर हे विधान करत आहेत हा खरा प्रश्न आहे. एका दगडात दोन पक्षी मारण्यात केसरकर माहीर आहेत. राणेंसोबत जमवून घेताना ते हे साध्य करत आहेत. ते एकटे या मतदारसंघात फिरू शकत नसल्याने तापलेल्या तव्यावर आपली भाकरी भाजून घेण्याचे काम केसरकर करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या किरण सामंत यांच्या ऐवजी ते राणेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. या मतदारसंघात कितीही वल्गना केली तरी केसरकरांना जनता बळी पडणार नाही. त्यांचे सोयीचे राजकारण जनतेच्या लक्षात आलं आहे. नारायण राणेंनी देखील मागचा अनुभव पाहता आता केसरकरांच्या भुलथापांना बळी पडू नये असं मत उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार यांनी व्यक्त करत खासदार विनायक राऊत तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.