मुंबईतील बोट दुर्घटनेत म्हासोलीच्या विवाहितेचा मृत्यू
कराड :
मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटा बेटाकडे प्रवासी घेऊन जाणारी बोट आणि नौदलाची चाचणी स्पीड बोट यांच्या समुद्रात झालेल्या धडकेत 13 जणांचा बुडून मृत्यू झाला होता. यात कराड तालुक्यातील म्हासोली गावच्या सौ. प्रज्ञा विनोद कांबळे (वय 40) या सद्या नवी मुंबई येथे राहणाऱ्या विवाहितेचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे म्हासोली परिसरावर शोककळा पसरली आहे.
प्रज्ञा विनोद कांबळे मुंबईतील चेंबूर येथे एलआयसी कार्यालयात नोकरीस होत्या. तर त्यांचे पती विनोद कांबळे हेही मुंबईत नोकरीस होते. म्हासोली हे विनोद कांबळे यांचे मूळ गाव असून गावी त्यांचे आईवडील असतात. त्यांची दोन्ही मुले कराड येथे शिक्षण घेत आहेत.
प्रज्ञा कांबळे या कार्यालयातील मैत्रिणींसमवेत गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटा बेट पाहण्यासाठी जात होत्या. त्यावेळी नौदलाच्या चाचणी स्पीड बोटची त्यांच्या बोटला धडक बसली. त्या धडकेने बोट बुडाली. यात प्रज्ञा कांबळे यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती म्हासोली येथील कुटुंबीयांना मध्यरात्री मिळाली. रात्रीच त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.