Kolhapur News: म्हाकवेच्या सिद्धेश्वर झांज पथकाचा नाद उद्या दिल्लीस घुमणार
म्हाकवेतील कलाकारांना अभिमानासह पारंपरिक कला सादर करण्याची मोठी संधी
म्हाकवे : येथे पारंपरिक कलांचे जतन आणि प्रसार करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या गावातील श्री बाल अवधूत सोंगी भजन मंडळ व अचानक लेझीम मंडळ यांच्या झांज पथकाचा नाद थेट देशाच्या राजधानीत, दिल्ली दरबारात घुमणार आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या विशेष सहकार्यामुळे या मंडळाला महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे म्हाकवे गावातील कलाकारांना अभिमानासह आपली पारंपरिक कला सादर करण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे.
या मंडळाची स्थापना 1 सप्टेंबर 1983 रोजी झाली. संस्थापक अशोक पाटील, कै. विलास पाटील, कै. राजाराम गुरव, आनंदा पाटील, साताप्पा पाटील, कै. अशोक पोतदार, कै. श्रीकांत पाटील, एकनाथ पाटील यांसारख्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून या मंडळाची सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांचा गजर, भक्तीगीतांचा ठेका आणि शिस्तबद्ध सादरीकरण यामुळे या मंडळाने गेल्या चार दशकांपासून तालुक्यात, जिह्यात तसेच राज्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सोंगी भजन, लेझीम, झांजपथक, हलगी, समईनृत्य या वाद्यांच्या तालावर प्रकट होणारी भक्तिभावाची लय प्रेक्षकांना भारावून टाकते. या मंडळाने आतापर्यंत अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन कागल तालुक्याची कला परंपरा जोपासली आहे. आता दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात होणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्यात या पथकाचा नाद घुमणार असल्याने म्हाकवे गावाच्या परंपरेला नवे व्यासपीठ मिळणार आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी या पथकाला दिलेल्या सहकार्यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या सोहळ्यात भाग घेण्याचा मान मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. “हे यश केवळ मंडळाचे नसून संपूर्ण गावाचे आहे. आपल्या परंपरेचा नाद दिल्ली दरबारी पोहोचणार आहे,“ अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
म्हाकवेच्या झांज पथकाच्या सादरीकरणामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण कलांचा नाद राजधानीत घुमणार आहे. पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य, भक्तिभावाचा आविष्कार आणि एकत्रित सादरीकरण यातून महाराष्ट्राची संस्कृती दिल्लीकरांसमोर उजागर होणार आहे. त्यामुळे म्हाकवे गावाच्या सांस्कृतिक इतिहासात हा क्षण सुवर्णक्षण ठरणार आहे. सध्या या झांज पथकाचे नेतृत्व रामदास गुरव, राहुल पाटील, रणजीत वाडकर, सिद्राम बेलवाडे प्रकाश पाटील, सुशांत पाटील करत आहेत.