'म्हैसाळ'चे आवर्तन आजपासून पुन्हा सुरू
सांगली :
वारणा धरणातून विसर्ग बंद पडला तर कोयनेतून वाढीव पाण्याचा विसर्ग सोडण्यात तांत्रिक अडचणी आल्याने गेले आठवडाभर बंद पडलेले म्हैसाळ योजनेचे आवर्तन सोमवारपासुन पुन्हा सुरू झाले. ऐन उन्हाळ्यात कृष्णेतील पाणीपातळी खालावल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद पडल्याने दुष्काळ भाग हवालदिल झाला होता.
वारणा धरणातून म्हैसाळ योजनेसाठी १६०० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला होता. परंतू कोडोली बंधारा दुरूस्तीचे काम सुरू असल्याने वारणेतून विसर्ग बंद करण्यात आला होता. दुरूस्तीनंतर पाणी सोडले. पण दानोळी बंधाऱ्यातून म्हैसाळ बंधाऱ्यापर्यंत पाणी येण्यासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी संपला. त्यामुळे ऐन उन्हाळयात म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद पडले होते.
पण कोयनेतूनही वाढीव पाणी सोडण्यात आले नाही. परिणामी योजनेचे आवर्तन बंद पडले होते. आता वारणा धरणातील पाणी म्हैसाळ बंधाऱ्यात पोहोचले. तर कोयनेतून एक हजार क्युसेक्सने विसर्ग वाढवून ३१०० क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून म्हैसाळ योजनेचे पंप सुरू करण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आली.
- आजपासून कोयनेतून ३१०० क्युसेक्स विसर्ग : देवकर
सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्याने मंगळवार दि. ४ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता अतिरिक्त एक हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याव्दारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये आजपासून ३१०० क्युसेक्स विसर्ग सुरू होईल, अशी माहिती पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.
- म्हैसाळ योजनेचे नियोजन बिघडले
दुष्काळी जत, कवठेमहांकाळसह सोलापूर जिल्हयातील काही भागालाही म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाचा आधार आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाचे नियोजन कोलमडले आहे. अधिकारी पाणी वितरीत करताना शेतकरी आणि लोकप्रतिनिधींचीही दिशाभूल करून हम करे सो कायदा याप्रमाणे वागू लागले आहेत. अधिकारी आणि ठराविक लोकप्रतिनिधींच्या संगनमतातून मनमानीपणे असमान पाणी सोडतात. पाणी वितरणात राजकीय हस्तक्षेपामुळे काही गावावर अन्याय केला जातोय असा आरोप सुरू झाला आहे. ऐन उन्हाळ्यात यावरून दुष्काळी जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाचे काटेकोर नियोजन करण्याची मागणी होत आहे.