मगो आमसभेत विधानसभा निवडणूक रणनीतीवर चर्चा; युती, जागावाटप, उमेदवार निश्चितीचे अधिकार संसदीय समितीला
पणजी: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या काल शनिवारी झालेल्या आमसभेत पक्षाच्या आगामी विधानसभा निवडणूक रणनीतीवर विशेष भर देण्यात आला असला तरी भाजपसोबत युतीद्वारे लढायची की स्वबळावर पुढे जायचे, तसेच युती झालीच तर किती मतदारसंघांवर दावा करायचा यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही. तो निर्णय संसदीय मंडळाकडून घेण्यात येईल, अशी माहिती मगो पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली.
शनिवारी येथील गोमंतक विद्यमान केंद्रीय समितीला तीन वर्षांची मुदतवाढ पुढे बोलताना ढवळीकर यांनी आमसभेत घेतलेल्या प्रमुख निर्णयांबद्दल माहिती दिली. त्यात प्रामुख्याने विद्यमान केंद्रीय समितीलाच पुढील तीन वर्षांसाठी कायम ठेवण्याचा सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, या समितीतील जुन्या चार सदस्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून त्याला आमसभेने मान्यता दिली. त्यात संकेत नाईक मुळे, भारत तोरसकर, दत्तप्रसाद सांगेकर आणि नारायण वेर्लेकर यांचा समावेश आहे, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली.
किमान पाच जागा जिंकण्याची खात्री
राज्यातील आम्ही १६ मतदारसंघांमध्ये आमचे प्राबल्य असून स्वतंत्रपणे लढलो तरी किमान पाच जागा खात्रीने जिंकू, असे ढवळीकर यांनी सांगितले. तसेच आपण स्वतः शिरोडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार हेही निश्चित असले तरी या विषयावर युतीतील घटक पक्षाशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत प्रामुख्याने बूथ समित्या, पक्षाचा अजेंडा आणि निवडणुकीच्या पायाभूत तयारीबाबत चर्चा करण्यात आली. सध्या मगोप भाजपसोबतच्या युतीमध्ये कायम राहण्याच्या विचारात असली, तरी जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय निवडणुकीच्या काळात पक्षाची केंद्रीय आणि संसदीय समिती संयुक्तरित्या घेतील, तसेच उमेदवार निश्चित करण्याचे पूर्ण अधिकार पक्षाच्या संसदीय समितीकडे असतील, असे ढवळीकर यांनी सांगितले.
प्रारंभ पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन तिळू नाईक यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने आमसभेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर वीजमंत्री सुदिन ढवळीकर, अध्यक्ष दीपक ढवळीकर, अॅड. नारायण सावंत, प्रताप फडते, अनंत नाईक, राघोबा गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
