मगोच्या केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये 16 मतदारसंघांतील समित्यांना मान्यता
पणजी/ विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या केंद्रीय समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये एकूण 16 मतदारसंघातील समित्यांना मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारने आदिवासींना विधानसभेत आरक्षण दिल्याबद्दल बैठकीत अभिनंदन करण्यात आले तसेच पक्षाच्या आमसभेची बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा निर्णय झाला.
बैठकीनंतर पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले की, केंद्र सरकारने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यातील आदिवासी जनतेच्या मागण्या पूर्ण केल्या आणि त्यांना आता विधानसभेत आरक्षण प्राप्त झाले आहे. थोडा उशीर झाला खरा परंतु केंद्र सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासाठी प्रयत्न केले त्यामुळे केंद्र सरकारचे आणि गोवा सरकारचे देखील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने अभिनंदन केले आहे.
केंद्रीय समितीच्या या बैठकीमध्ये केंद्र सरकारचा अभिनंदनचा ठराव मंजूर झाला. त्याचबरोबर सोळा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्रत्येकी 40 सदस्य समित्यांना बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची आमसभा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच आमसभेत घ्यावयाचे विषय यावर देखील चर्चा करण्यात आली.
आगामी राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. आरक्षण झाल्यामुळे आता आमच्याकडे उमेदवार देखील भरपूर आहेत, असे माजी मंत्री दीपक ढवळीकर म्हणाले. भारतीय जनता पक्षाबरोबर युती आहे, मात्र युती संदर्भात भाजपच्या नेत्यांबरोबर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले सध्या तरी 16 मतदारसंघात आम्ही आमची संघटना मजबूत ठेवलेली आहे, असेही दीपक ढवळीकर म्हणाले.
होय, शिरोड्यातून निवडणूक शक्य
दीपक ढवळीकर यांनी सांगितले की आदिवासींना आरक्षण दिल्यानंतर आता भाजपकडे युती असल्यामुळे युतीचा धर्म पाळूनच भाजपच्या नेत्यांची मान्यता घेऊन शिरोडा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहे. अद्याप युतीची बोलणी झालेली नाही, तोपर्यंत आपण शिरोडा मतदारसंघामध्ये जाऊन चाचपणी सुरू केली आहे आणि आपल्याला उत्तम प्रतिसाद जनतेकडून मिळत असल्याचा दावा दीपक ढवळीकर यांनी केला.