मेक्सिकोत मोस्ट वाँटेड ड्रग तस्करचा खात्मा
सैन्यमोहिमेला यश : एल मेंचोच्या मृत्यूनंतर मेक्सिकोत हिंसा
वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
जगातील मोस्ट वाँटेड ड्रग तस्करांपैकी एक प्रसिद्ध कार्टेल लीडर नेमेसियो रुबन ओसेगुएरा सर्वेंटेंस म्हणजेच एल मेंचो हा मेक्सिकोत मारला गेला आहे. मेक्सिकोच्या संरक्षण मंत्रालयाने एल मेंचो मारला गेल्याची पुष्टी दिली आहे. 59 वर्षीय ड्रग माफियाला मेक्सिकोच्या जलिस्को प्रांतात एका मोहिमेदरम्यान मारण्यात आले आहे. कधीकाळी पोलीस अधिकारी राहिलेल्या एल मेंचोची टोळी जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल मागील 10 वर्षांमध्ये मेक्सिकोची सर्वात शक्तिशाली आणि क्रूर टोळी ठरली होती.
मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लाउडिया शीनबाम यांनी एल मेंचोच्या खात्म्याची पुष्टी करणे टाळण्याचा प्रयत्न केला. याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता शीनबाम यांनी सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याप्रकरणी माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एल मेंचोच्या मृत्यूनंतर मेक्सिकोच्या अनेक राज्यांमध्ये हिंसा भडकली आहे. कार्टेलच्या सदस्यांनी सैन्यमोहिमेनंतर हिंसा सुरू केली आहे. अनेक ठिकाणी कार्टेलचे सदस्य आणि सुरक्षादलांची झटापट झाली आहे. गुंडांनी बसेस आणि मॉल्सना पेटवून दिले आहे. महामार्गावरील वाहतूक रोखून कार्टेलच्या सदस्यांनी सर्वसामान्यांना वेठीस धरले आहे.
अमेरिकेकडून मोहिमेत मदत
एल मेंचो विरोधी सैन्यमोहिमेत अमेरिकेने मदत केल्याचे मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. युएस टास्क फोर्सने या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जानेवारीत स्थापना झाल्यापासून युएस टास्क फोर्सने अमेरिका-मेक्सिको सीमेवर कार्टेलच्या कारवाया रोखण्यासाठी मेक्सिकोच्या सैन्यासोबत सातत्याने काम केले आहे.
कोणत होता ड्रग लॉर्ड एल मेंचो?
ओसेगुएरा उर्फ एल मेंचो हा मेक्सिकोतील मोस्ट वाँटेड ड्रग तस्कर होता. त्याने सर्वात धोकादायक कार्टेल सीजेएनजीचे नेतृत्व करत जलिस्को आणि आसपासच्या भागांमध्ये स्वत:ची शक्ती अन् नियंत्रण वाढविले होते. मेक्सिकोच्या सुरक्षा यंत्रणा दीर्घकाळापासून त्याचा शोध घेत होत्या. 2018 मध्ये मेक्सिकोने त्याच्याबद्दल माहिती दिल्यास 17 लाख डॉलर्सचे इनाम जाहीर केले होते. अमेरिकेच्या यंत्रणांसाठीही एल मेंचो वाँटेड होता. अमेरिकेने त्याच्याविषयी माहिती देण्यासाठी 1.5 कोटी डॉलर्सचे इनाम जाहीर केले होते.