For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेक्सिकोच्या आशा धुळीस, इंग्लंडची 3-2 ने सरशी

06:56 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेक्सिकोच्या आशा धुळीस  इंग्लंडची 3 2 ने सरशी
Advertisement

वृत्तसंस्था, मेक्सिको सिटी : रविवारी रात्री झालेल्या एका रोमांचक सामन्यात, ज्यूड बेलिंगहॅम आणि हॅरी केन यांनी इंग्लंडला विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले. प्रेक्षकांचा प्रचंड गोंगाट, ‘एस्तादियो आझतेका’ची समुद्रसपाटीपासूनची अधिक उंची आणि दुसऱ्या सत्रामध्ये एका खेळाडूची कमतरता यासारख्या आव्हानांवर मात करत त्यांनी मेक्सिकोचा 3-2 असा पराभव केला.

Advertisement

1986 च्या विश्वचषकात अर्जेंटिनाविऊद्धच्या सामन्यात दिएगो माराडोनाच्या ‘हँड ऑफ गॉड’ गोलचा बळी ठरलेल्या याच स्टेडियमवर 40 वर्षांनंतर केनने देशाला त्या पराभवाचा वचपा काढून दिला. बेलिंगहॅमने पहिल्या सत्रामध्ये 98 सेकंदांच्या अंतराने दोन गोल केले. जॅरेल क्वानसाहला मैदानाबाहेर पाठवल्यानंतर सहा मिनिटांनी केनने पेनल्टीवर गोल करत इंग्लंडची ााघाडी पुन्हा कायम राखली. आता उपांत्य फेरीतील स्थानासाठी इंग्लंडचा सामना शनिवारी फ्लोरिडातील मियामी गार्डन्स येथे नॉर्वेविऊद्ध होणार आहे.

बेलिंगहॅमने 36 व्या मिनिटाला हेडरद्वारे आणि 38 व्या मिनिटाला केनच्या पासवर गोल करत उपस्थित 80,824 प्रेक्षकांना थक्क केले. मेक्सिकोचा संघ या स्टेडियमवर या स्पर्धेतील तीन सामन्यांसह विश्वचषकातील 10 सामन्यांत अपराजित राहिला होता. 42 व्या मिनिटाला ज्युलियन क्विनोनेसने मेक्सिको संघासाठी गोल केला. 54 व्या मिनिटाला जेसस गॅलार्डोच्या बाबतीत धोकादायक ‘फाऊल’ केल्याबद्दल क्वानसाहला रेड कार्ड दाखवण्यात आले तेव्हा सामना मेक्सिकोच्या बाजूने झुकल्याचे वाटत होते.

Advertisement

परंतु मेक्सिकोचा गोलरक्षक राऊल रँजेल याने प्रतिस्पर्ध्याला रोखण्याच्या केलेल्या प्रयत्नामुळे इंग्लंडला पेनल्टी मिळाली. केनने यावर गोल नोंदविण्यात यश मिळविले. त्यानंतर मेसिक्कोला मिळालेल्या पेनल्टीवर राउल जिमेनेझने धावताना मध्येच क्षणभर थांबण्याची शैली वापरून ती पेनल्टी यशस्वीरीत्या गोलमध्ये रूपांतरित केली आणि परिस्थिती 3-2 अशी केली. शेवटच्या 21 मिनिटांत आणि त्यानंतरच्या 11 मिनिटांच्या ‘स्टॉपेज टाइम’मध्ये मेक्सिकोने जोरदार आक्रमणे केली, परंतु गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्ड आणि इंग्लंडच्या बचावपटूंनी भक्कमपणे बचाव केला. 1986 मध्ये यजमानपद भूषवल्यापासून मेक्सिकोला विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारता आलेली नाही

दरम्यान, सामन्यानंतर मनगटाच्या दुखापतीमुळे इंग्लंडचा मिडफील्डर जॉर्डन हेंडरसनला ऊग्णालयात नेण्यात आले, असे प्रशिक्षक ट्युचेल यांनी सांगितले. सामन्यानंतर आनंद साजरा करत असताना जाहिरातीच्या फलकावर पडल्यामुळे त्याला ही दुखापत झाली.

 गोल करणारा व पेनल्टीस कारणीभूत ठरलेला केन 60 वर्षांतील पहिला खेळाडू

केनने या सामन्यात स्पर्धेतील आपला सहावा आणि विश्वचषक कारकिर्दीतील 14 वा गोल नोंदवला. यासह त्याने सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत पश्चिम जर्मनीच्या गर्ड मुलरची बरोबरी करत पाचवे स्थान गाठले आहे. ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत केन आता मेस्सी, एमबाप्पे आणि हालांद यांच्यापेक्षा एका गोलने मागे आहे. परंतु पेनल्टीवर गोल केल्यानंतर केनकडून एक ‘फाऊल’ घडले ज्यामुळे 1966 नंतर विश्वचषकाच्या सामन्यात एकाच वेळी गोल करणारा आणि पेनल्टीला कारणीभूत ठरलेला तो पहिला खेळाडू ठरला.

Advertisement
Tags :

.