For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेक्सिको बाद फेरी गाठणारा पहिला देश

06:55 AM Jun 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेक्सिको बाद फेरी गाठणारा पहिला देश
Advertisement

दक्षिण कोरियावर 1-0 ने मात, लुईस रोमोने बचावफळीतील चुकीचा फायदा घेत केला गोल

Advertisement

वृत्तसंस्था

ग्वाडालाजारा, मेक्सिको : : मेक्सिकोने दक्षिण कोरियाच्या बचावफळीतील एका चुकीचा फायदा घेत 1-0 असा विजय मिळवला आणि विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश करणारा तो पहिला संघ ठरला. या विजयामुळे देशभरातील चाहत्यांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला.

Advertisement

दक्षिण कोरियाचा गोलरक्षक किम सेउंग-ग्यू याची बचावपटू ली जी-ह्युकशी धडक झाली आणि त्याच्या हातातून चेंडू निसटून ‘पेनल्टी एरिया’मध्ये पडला. त्यानंतर 50 व्या मिनिटाला लुईस रोमोने गोल केला. तो मोकळा झालेला चेंडू ताब्यात घेऊन रोमोने सहजपणे रिकाम्या जाळीत सारला. 87 व्या मिनिटाला दक्षिण कोरियाने बरोबरी साधण्याची संधी निर्माण केली होती. पण मेक्सिकोचा गोलरक्षक राउल रँजेलने चो गू-सुंगचा जवळून मारलेला हेडर रोखला आणि त्यानंतर यांग ह्युन-जुनने परत आलेल्या चेंडूवर केलेल्या प्रयत्नालाही उत्कृष्टरीत्या अडवले. त्याने आपला उजवा हात पुढे करून चेंडूला गोल-लाईन ओलांडण्यापासून रोखले.

मेक्सिकोने दोन सामन्यांत सहा गुणांसह ‘गट अ’मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ते दक्षिण कोरियापेक्षा तीन गुणांनी आणि झेक प्रजासत्ताक व दक्षिण आफ्रिकेपेक्षा पाच गुणांनी पुढे आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ आणि तिसऱ्या स्थानावर राहिलेले सर्वोत्तम आठ संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतात. स्पर्धेत 48 संघांचा समावेश केल्यानंतर विश्वचषकात पहिल्यांदाच 32 संघांची फेरी खेळविली जाणार आहे. मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेविऊद्ध 2-0 असा विजय मिळवून स्पर्धेची सुऊवात केली होती, तर दक्षिण कोरियाने पिछाडीवरून मुसंडी मारत झेक संघावर 2-1 असा विजय नोंदवला होता. मेक्सिको आपल्या गटातील शेवटचा सामना मेक्सिको सिटीमध्ये झेक प्रजासत्ताकविऊद्ध खेळणार आहे, तर दक्षिण कोरियाचा सामना मॉन्टेरी येथे दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

आपल्या देशात मेक्सिको सिटीबाहेर विश्वचषकातील सामना जिंकण्याची कामगिरी मेक्सिकोला यापूर्वी कधीही जमली नव्हती. 1970 व 1986 च्या स्पर्धांदरम्यान मायदेशात खेळल्या गेलेल्या त्यांच्या 9 विश्वचषक सामन्यांपैकी आठ सामने एस्तादियो आझतेका येथे झाले होते, ज्यात पाच विजय आणि तीन बरोबरी नोंदल्या गेल्या होत्या. 1970 मध्ये जेव्हा ते टोलुका येथे सामना खेळले होते तेव्हा उपांत्यपूर्व फेरीत त्यांना इटलीकडून 4-1 असा पराभव पत्करावा लागला होता.

फुटबॉल रसिकांकडून देशभरात जल्लोष

2022 मध्ये गट फेरीत बाहेर पडलेल्या मेक्सिको संघासाठी हा एक मोठा विजय आहे. आता त्यांनी आपल्याच देशात उत्साही प्रेक्षकांच्या उपस्थितीत सलग दोन सामने जिंकले आहेत. एस्तादियो अॅक्रॉन स्टेडियममधील खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहात चाहते जयघोष करत असताना आणि गाणी गात असताना मेक्सिकोच्या खेळाडूंनी मैदानावर आनंद साजरा केला आणि चाहत्यांना अभिवादन केले. सामना संपल्याची शिट्टी वाजताच मेक्सिको सिटीमधील एंजल ऑफ इंडिपेंडन्स येथे ’मारियाची’ (पारंपरिक संगीतकार) गायन करू लागले आणि हजारो लोक सर्व दिशांनी तिथे जमा झाले. ग्वाडालाजारातील काही रस्ते गाड्यांचे हॉर्न वाजवणारे चालक आणि मेक्सिकोचे झेंडे फडकवत घोषणा देणाऱ्या चाहत्यांनी भरून गेले.

Advertisement
Tags :

.