For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेट्रोचे जाळे

06:39 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेट्रोचे जाळे
Advertisement

मेट्रोचे जाळे

Advertisement

महाराष्ट्रासह देशातील विविध शहरांचा प्रवास सध्या मेट्रो सिटीजच्या दिशेने सुरू आहे. वाहतूक कोंडीची देशव्यापी समस्या पाहता मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण ही काळाची गरजच म्हणता येईल. तरीही काही भागांत मेट्रो ही प्रवाशांच्या प्रतीक्षेत दिसते. हे पाहता अधिक शास्त्रीय पद्धतीने मेट्रो प्रकल्प पुढे न्यावे लागतील.

लकाता आणि राजधानी दिल्ली या दोन महानगरांनंतर मुंबई, नागपूर, पुणे, बेंगळूर, हैदराबादसह विविध शहरांमध्ये मेट्रो धावायला सुरुवात झाली आहे. तर अन्य शहरांमध्येही मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू असल्याचे पहायला मिळते. मात्र, अद्यापही मेट्रोची गाडी म्हणावी तशी रूळावर आली नसल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य. नोकरीधंद्यासाठी लोकांचा सर्वाधिक कल मुंबईसह राज्यातील शहरांकडेच असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकरणाचा वेगही प्रचंड असून, तुलनेत वाहतुकीच्या सोयीसुविधा कमी पडताना दिसतात. याशिवाय वाहतूक कोंडी हा महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमधील जटील प्रश्न होऊन बसला आहे. यावर विविध उपाययोजना सुरू असून, मेट्रो हा त्यातील एक पर्याय मानला जातो. वेळेची, इंधनाची व पैशाची होणारी बचत, हा मेट्रोचा प्लस पॉईंट. याशिवाय प्रदूषणावरीलही चांगला उतारा. तथापि, महाराष्ट्रासारख्या राज्यात 97 हजार कोटी रुपये खर्चूनही अद्याप मेट्रोला प्रवाशांची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे. राज्यात मुंबई, नागपूर, पुण्यामध्ये नऊ मेट्रो प्रकल्प आहेत. या प्रकल्पांच्या आराखड्यानुसार दररोज सुमारे 70 लाख 50 हजार प्रवासी अपेक्षित आहेत. परंतु, प्रत्यक्षात सर्व मेट्रो मार्गांवर दररोज केवळ 13 लाख 32 हजार इतकेच प्रवासी प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे. अपेक्षित लक्ष्यापेक्षा ही गती कमीच म्हणावी लागेल. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पांना गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. खरे तर सर्वाधिक प्रवासी संख्येची मेट्रो म्हणून दिल्ली मेट्रोकडे पाहिले जाते. कोलकाता मेट्रो ही तर देशातील पहिली व स्वस्त मेट्रोसेवा. बेंगळूर मेट्रोलाही अलीकडच्या काळात प्रवासी चांगला प्रतिसाद देत आहेत. बेंगळूर हे आयटी सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. नेटवर्क वाढल्यानंतर या सेवेला अधिक पसंती मिळाल्याचे सांगण्यात येते. हे समजून घेतले, तर महाराष्ट्रातील महानगरांमध्ये आगामी काळात नक्कीच प्रवासी संख्या वाढण्यास वाव असेल. पुण्यात पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी हे दोन मेट्रो प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी हा टप्पा लवकरच सुरू होईल, असे सांगण्यात येते. आयटी कंपन्यांमुळे हिंजवडीची ख्याती वाढली आहे. परंतु, या टप्प्याला अपेक्षेपेक्षा अधिक विलंब झाला. हिंजवडी परिसरातील वाहतुकीचा प्रश्न ध्यानात घेऊन तरी तेथे ही सेवा लवकर सुरू व्हावी, ही पुणेकरांची अपेक्षा आहे. मुळात सर्व प्रकल्प परस्परांना जोडल्याशिवाय मेट्रोला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकत नाही. पिंपरी ते स्वारगेट प्रकल्पाचे निगडी ते कात्रज असे विस्तारीकरण झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने नागरिकांच्या प्रवासाची सोय होणार आहे. या टप्प्याचे काम पूर्णत्वाला गेल्यानंतर नक्कीच सर्वाधिक व्यस्त मार्ग म्हणून तो गणला जाऊ शकतो. याखेरीज शहरातील इतर मार्गांची जोडाजोड व सर्वदूर जाळे निर्माण करणे, पार्किंगची सुविधा, यातून मेट्रो अधिक लोकाभिमुख होऊ शकते. नागपूर मेट्रोचे काम सुपरफास्ट झाले. पण, तेथील लोकांच्या मेट्रो फार अंगवळणी पडलेली दिसत नाही. खरे तर तेथील रस्तेही बऱ्यापैकी रुंद आहेत. त्यामुळे लोक वाहन वापरणे पसंत करतात, असे बोलले जाते. अर्थात नेटवर्क, कनेक्टिव्हिटी या गोष्टी वाढल्या, तर सर्वच मेट्रो प्रकल्पांना नक्कीच आणखी चांगला प्रतिसाद मिळू शकतो. त्याकरिता निधीचीही तरतूद हवी. ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता तिथे भरभरून निधी, इतरत्र हात आखडता, अशाही काही तक्रारी आहेत. तसे होऊ नये. त्याचबरोबर संबंधित शहराची गरज लक्षात न घेता जिथे तिथे मेट्रो प्रकल्प उभे करणेही घाईचे ठरू शकते. पुढच्या काही वर्षांमध्ये वाहतुकीचा प्रश्न भयंकर रूप धारण करू शकतो, याचे नमुने अधूनमधून पहायला मिळत असतात. अशा वेळी मेट्रोसह सर्वच सार्वजनिक व्यवस्था बळकट असायला हव्यात. म्हणूनच मेट्रोचे जाळे अधिक शास्त्रीय पद्धतीने देशभर विणावे लागेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.