For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिक्षांना मीटरसक्ती ठरला निव्वळ फार्स

12:19 PM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
रिक्षांना मीटरसक्ती ठरला निव्वळ फार्स
Advertisement

रिक्षाचालकांकडून मनमानीपणे भाडेवसुली सुरूच : प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरात रिक्षांना मीटरची सक्ती हा विषय आणखी एकदा निव्वळ फार्स ठरला आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये रिक्षांना मीटरसक्ती करण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. नोव्हेंबर सुरू होऊन आठवडा संपला तरी मीटरसक्ती झालेली नाही. त्यामुळे मीटरडाऊन ही मोहीम पुन्हा एकदा फार्स ठरल्याचे दिसून आले. रिक्षाचालक मनमानीपणे भाडे वसूल करीत असल्याची प्रवाशांची तक्रार आल्याने याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रिक्षांना मीटरची सक्ती करण्याचे म्हटले होते. हा विषय शहरात फक्त कालचा किंवा आजचा नाही तर गेल्या दशकभरापासून गाजतच आहे. पण अद्याप सक्तीची अंमलबजावणी न झाल्याने प्रवाशांना रिक्षाचालक सांगतील ते भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाबद्दल जनतेत नाराजी आहे. बेंगळूर, म्हैसूर, मंगळूर या मोठ्या शहरात रिक्षांना मीटरची सक्ती आहे. त्यापाठोपाठचे मोठे शहर म्हणून बेळगाव शहराचा उल्लेख केला तरी येथे रिक्षांना मीटरसक्तीची अंमलबजावणी अद्याप होत नसल्याने प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. एक-दोन किलोमीटरच्या अंतरासाठी रिक्षाचालकांकडून 100 ते 180 रुपये भाडे घेण्यात येत आहे.

बेळगाव शहरात 12 हजारांहून अधिक रिक्षा असून आरटीओकडून परवाना देत असताना रिक्षांना मीटर लावले असल्याची खातरजमा करून घेण्यात येते. पण चालक रिक्षा चालविण्यासाठी हातात घेतल्यानंतर मीटर लावतच नाहीत. हा आजपर्यंत अनेक प्रवाशांना आलेला अनुभव आहे. अधिक भाडे घेणाऱ्या ऑटोचालकांविरुद्ध कायदा-मापन शास्त्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. रिक्षांना मीटर लावण्यास आमची काहीच तक्रार नाही. पण प्रतिकिलोमीटरला 20 रुपये दर द्यावा, मागील अनेक वर्षांपासून रिक्षासाठी असलेला किमान दर आजही घेण्यात येतो आहे. मात्र, हे रिक्षाचालकांना तोट्याचे आहे. दरात सुधारणा व्हावी. किमान दर 40 रुपये करावा. तरच रिक्षाचालकांना परवडणार आहे, असे अनेक रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात सहा आसनी (टमटम) रिक्षा व खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचा शहरात सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना फटका बसत आहे. मीटर दुरुस्तीसाठी मेकॅनिक उपलब्ध होत नाहीत. ते उपलब्ध करून द्यावे. रिक्षासाठी किमान दर निश्चित करावा. तेव्हाच रिक्षांना मीटरसक्ती करणे योग्य ठरेल, असे संघाचे अध्यक्ष मन्सूर होनगेकर म्हणताहेत.

Advertisement

अनधिकृत वाहनांचे शहरात पेव

रिक्षांना मीटरसक्ती हा विषय पुढे येताच रिक्षाचालक एक ना एक सबब पुढे करीत मीटरसक्तीचा विरोध दर्शवित आहेत. शहरातील रस्त्यांची पहिल्यांदा दुरुस्ती करा. टमटम, मॅक्सिकॅब, अनधिकृत रिक्षांना आवर घाला तेव्हाच रिक्षांना मीटरसक्ती करा, असे रिक्षाचालक म्हणतात. पोलीस व आरटीओ खाते याकडे लक्ष देत नसल्याने अनधिकृत वाहनांचे शहरात पेव फुटले आहे, अशी तक्रारही काही रिक्षाचालक करीत आहेत.

प्रवाशांनी कोणाकडे तक्रार करावी?

तत्कालिन शहर पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात तक्रार करा, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर करून तक्रार दाखल करण्यासाठी स्वतंत्र एक दूरवाणी क्रमांक जाहीर करण्यात आला होता. अलीकडे ही व्यवस्था बंद झाल्याने प्रवाशांना कोणाकडे तक्रार करावी? असा प्रश्न पडला आहे.

रिक्षांना मीटर सक्तीच्या सूचनेकडे दुर्लक्ष

तत्कालिन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी 2022 मध्ये रिक्षांना मीटर लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन खात्याला तसेच पोलीस खात्यालाही सूचना केल्या होत्या. तरीही रिक्षांना मीटर वापरण्यात येत नव्हते. या दरम्यान, शहराला भेट दिलेल्या एडीजीपी अलोककुमार रिक्षांना मीटरची सक्ती करावी, अशी सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली होती. तरीही या सूचनेचे अद्याप पालन झालेले नाही.

हिवाळी अधिवेशनानंतर रिक्षांना मीटरची सक्ती

प्रादेशिक परिवहन खाते व ऑटोरिक्षाचालक संघटना सभा घेऊन रिक्षांना मीटरची सक्ती करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. हिवाळी अधिवेशनानंतर रिक्षांना मीटरची सक्ती करण्यात येईल.

- मोहम्मद रोशन, जिल्हाधिकारी

चर्चा करून मीटरसक्तीबाबत निर्णय

जिल्हा प्रशासन, कायदा-मापनशास्त्र खाते व पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून रिक्षांना मीटरची सक्ती करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

- नागेश मुंडास, आरटीओ बेळगाव

Advertisement
Tags :

.