For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवानंतर आता ऑटोरिक्षांना मीटरसक्ती?

11:16 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सवानंतर आता ऑटोरिक्षांना मीटरसक्ती
Advertisement

अतिरिक्त पोलीस राज्य महासंचालक अलोककुमार यांच्या सूचना

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरात ऑटोरिक्षांना मीटर सक्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. स्वत: प्रशिक्षण वाहतूक व रस्ते सुरक्षा विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून ऑटोरिक्षांना मीटर सक्तीसाठी पावले उचलण्याची सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. गुरुवारी अलोककुमार बेळगाव दौऱ्यावर होते. पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस, महसूल, सार्वजनिक बांधकाम व इतर खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बेळगाव शहर व जिल्ह्यात अपघात टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अलोककुमार यांनी मीटर सक्तीचा मुद्दा उपस्थित केला. बेळगावात आता पोलीस आयुक्त कार्यालय झाले आहे. लोकांना काही तरी बदल झाल्याचे दिसले पाहिजे. ऑटोरिक्षांना मीटर सक्ती का होत नाही? असा प्रश्न उपस्थित करून आपण यासंबंधी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. खरे तर याआधीच मीटर सक्ती व्हायला हवी होती. यासाठी उशीर का लागतो आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

या बैठकीत बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस आदींसह बेळगाव शहर व जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. पत्रकारांशी बोलताना अलोककुमार पुढे म्हणाले, बेळगावात ऑटोरिक्षांना मीटर का नाही? यासंबंधात आपण अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. गणेशोत्सवानंतर मीटर सक्तीसाठी आपण सूचना केली आहे. लोकांना काही तरी बदल दिसले पाहिजेत. पोलीस आयुक्त कार्यालय झाल्यानंतर तरी मीटर सक्तीची अंमलबजावणी व्हायला हवी होती. सगळेच कारमधून फिरत नाहीत. अनेकांना ऑटोरिक्षातून प्रवास करावा लागतो. हा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मीटर लावणे गरजेचे आहे.

Advertisement

अपघात व अपघातातील मृत्यूचे प्रमाण घटवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. बेळगावात गेल्या तीन महिन्यात परिस्थिती सुधारली आहे. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे 15 ते 20 टक्के अपघात घटले आहेत. अपघात व अपघातातील मृत्यूंचा आकडा पाहता राज्यात बेळगावचा दुसरा क्रमांक लागतो. वर्षभरात 700 ते 850 जणांचा अपघाती मृत्यू होतो. मोटरसायकल अपघातातच 80 टक्के लोक दगावतात. निष्काळजीपणाने मोटरसायकल चालवणे व हेल्मेट परिधान न करणे हेही मृत्यूचे खरे कारण आहे. मोटरसायकल चालविणाऱ्यांकडे लायसन्स असते. मात्र, त्यांना ते व्यवस्थित चालवता येत नाही. याविषयी जागृती करण्याची गरज असल्याचे अलोककुमार यांनी सांगितले. बाची-रायचूर, यरगट्टी, निपाणी-मुधोळ रोडवरील अपघात घटवण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. महामार्गावर लेन डिसिप्लेन कॅमेरे आहेत. याविषयीही जागृती करण्याची गरज आहे. निपाणी, यमकनमर्डी, हिरेबागेवाडी, कित्तूर परिसरात महामार्गावर अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याची सूचना त्यांनी केली.

Advertisement
Tags :

.