धातू-वित्तीय क्षेत्रामुळे शेअरबाजाराला बळ
सेन्सेक्स 1577 अंकांनी भक्कम : टॅरिफ थांबवल्याचा दिलासा
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत होत बंद झाले आहेत. अमेरिकन प्रशासनाने 75 हून अधिक देशांवरील कर स्थगित केल्यानंतर, अमेरिकन बाजार तेजीत आले आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून आला. यामध्ये धातू आणि वित्तीय क्षेत्रांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी यांना तेजी राखता आली आहे. यासह एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल या सारख्या मजबूत समभागांनी भारतीय बाजाराला बळ दिले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1577.63 अंकांनी वधारुन निर्देशांक 2.10 टक्क्यांसह 76,734.89 वर बंद झाला आहे. याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी देखील मोठ्या तेजीसह उघडला. व्यवहारादरम्यान तो 500 अंकांनी वाढून 23,328.55 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 10 लाख कोटींची वाढ
बाजारपेठेतील तेजीसह, गुंतवणूकदारांच्या संपत्तीतही लक्षणीय वाढ झाली आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 412,29,007 कोटी रुपयांवर पोहोचले. शुक्रवारी ते 402,34,966 कोटी रुपये होते. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 10 लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
तेजीचे कारण काय?
- ट्रम्प यांनी ऑटोमोबाईल क्षेत्राला टॅरिफमधून तात्पुरती सूट देण्याचे सांगितले. ट्रम्प म्हणाले की, ऑटोमोबाईल कंपन्यांना कॅनडा, मेक्सिको आणि इतर ठिकाणांहून उत्पादन हलविण्यासाठी वेळ हवा आहे.
- सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेले बहुतेक हेवीवेट शेअर्स आज मजबूत राहिले. यामध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एम अँड एम, अॅक्सिस बँक आणि टाटा मोटर्स यांसारखी प्रमुख नावे आहेत.