33 वर्षे शरीरात राहिला मुंबई बॉम्बस्फोटातील धातूचा तुकडा! एमआरआय तपासणीवेळी मशीनमध्ये आवाज; हिंदुजा रुग्णालयात दुर्मिळ प्रकाराचा झाला उलगडा
चिपळूण : तब्बल 33 वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील जखमेची निशाणी एका एमआरआय तपासणीमुळे पुन्हा समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील चिखली येथील सुधीर तुकाराम मोहिते (वय 57) यांच्या शरीरात बॉम्बस्फोटातील धातूचा तुकडा तब्बल 33 वर्षे राहिल्याचे हिंदुजा रुग्णालयातील उपचारादरम्यान निदर्शनास आले. विशेष म्हणजे, एवढ्या प्रदीर्घ काळात या तुकड्यामुळे त्यांना कोणताही त्रास जाणवला नव्हता.
मोहिते यांना सौम्य स्वरूपाचा ब्रेन स्ट्रोक आल्याने 8 सप्टेंबर रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी एमआरआय तपासणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एमआरआय मशीनमध्ये तपासणी सुरू असताना अचानक आवाज येऊ लागल्याने तपासणी थांबवण्यात आली आणि मोहिते यांना तातडीने मशीनमधून बाहेर काढण्यात आले.
यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या ओठाच्या वरच्या भागातील गाठ साधी नसून धातूचा तुकडा असल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासणीत हा तुकडा तब्बल 33 वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. हा तुकडा आरडीएक्स मिश्रित स्फोटातील अवशेष असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, त्याची पुढील वैज्ञानिक तपासणी करण्यात येणार आहे.
1993च्या स्फोटाची शरीरात राहिली होती निशाणी
12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या मालिकेवेळी सुधीर मोहिते वरळी परिसरातील पासपोर्ट कार्यालयासमोरील मॉडर्न हॉटेलजवळील बस थांब्यावरून 172 क्रमांकाच्या बसने प्रवास करत होते. त्यावेळी झालेल्या स्फोटात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, तर असंख्य जण जखमी झाले.
या स्फोटात मोहिते यांच्या गालाला दुखापत झाली होती. त्यावेळी कुटुंबीयांनी त्यांना दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात नेऊन उपचार करून घेतले. जखमेवर ड्रेसिंग केल्यानंतर ते घरी परतले. मात्र, त्या जखमेबरोबरच स्फोटातील धातूचा एक तुकडाही त्यांच्या शरीरात राहिला असल्याची कल्पना त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना नव्हती.
ब्रेन स्ट्रोकच्या उपचारादरम्यान 33 वर्षांपूर्वीच्या रहस्याचा उलगडा
ब्रेन स्ट्रोकवरील प्राथमिक उपचार पूर्ण झाल्यानंतर 11 सप्टेंबर रोजी हिंदुजा रुग्णालयातील डॉ. कुमार ऋषी यांनी हा धातूचा तुकडा मोहिते यांच्या शरीरातून काढला. आता हा तुकडा पुढील तपासणी आणि वैज्ञानिक संशोधनासाठी पाठविण्यात येणार आहे.
1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातून बचावलेल्या मोहिते यांच्या शरीरात तब्बल 33 वर्षे दडून राहिलेली त्या भीषण घटनेची निशाणी अखेर MRI तपासणीमुळे समोर आली. एका वैद्यकीय तपासणीमुळे तीन दशकांपूर्वीच्या या घटनेची आठवण पुन्हा ताजी झाली असून, शरीरात इतका प्रदीर्घ काळ धातूचा तुकडा राहणे ही वैद्यकीयदृष्ट्या दुर्मिळ घटना मानली जात आहे.