For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मेटा’ने केली भारताकडे क्षमायाचना

06:35 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘मेटा’ने केली भारताकडे क्षमायाचना
Advertisement

पंतप्रधान मोदी यांची पोस्ट हटविण्याच्या प्रकरणात कंपनी प्रमुखांना समन्स, प्रकरण मिटविण्याचा यत्न

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्नपत्रिकाफुटीसंदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले एक रील हटविले जाण्याच्या प्रकरणात ‘मेटा’ने भारताकडे क्षमायाचना केली आहे. दोन दिवसांपूर्वी अचानकपणे हे रील इन्स्टाग्रामवरुन दिसेनासे झाले. त्यानंतर भारताने कंपनीकडे तीव्र आक्षेप नोंदवून कंपनीच्या प्रमुखांना भारत सरकारसमोर उपस्थित राहण्याविषयी समन्स पाठविले. त्यानंतर आता कंपनीने क्षमायाचना केली.

Advertisement

भारताच्या माहिती आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान विभागाने मेटाकडे आक्षेप नोंदविल्यानंतर मेटाने स्पष्टीकरण दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट हेतुपुरस्सर हटविण्यात आली नसून ती ‘तांत्रिक समस्ये’मुळे हटली गेली आहे, असे या कंपनीचे म्हणणे होते. मात्र, हे स्पष्टीकरण भारताला पटले नसून भारताने पाठविलेले समन्स अद्यापही लागू आहे, असे भारताकडूनही स्पष्ट केले गेले आहे.

‘रील’ कशासंबंधी...

नीट युजी प्रश्नपत्रिका फुटीच्या संदर्भात दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे रील 23 जुलै 2026 या दिवशी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पेलेल्या कठोर उपाययोजनेची माहिती या रीलमध्ये देण्यात आली होती आणि विद्यार्थीवर्गाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, हे रील 27 जुलैला अचानकपणे इन्स्टाग्रामवरुन गायब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे भारताने इन्स्टाग्रामचे व्यवस्थापन हाताळणाऱ्या मेटा कंपनीकडे तीव्र आक्षेप नोंदविला होता.

3 ऑगस्टला बैठक होणार

माहिती आणि दूरसंचार या विभागांच्या संदर्भातल्या सांसदीय स्थायी समितीची बैठक 3 ऑगस्ट या दिवशी होणार आहे. या बैठकीत मेटाची क्षमायाचना आणि पोस्ट हटविण्याचे प्रकरण यांच्या संदर्भात चर्चा होणार आहे. तसेच सोशल मिडिया नियंत्रणासंबंधीच्या उपाययोजनांच्या संदर्भातही विचार विमर्श केला जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे हे आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटस्अप, एक्स आणि गुगल या कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी या समितीसमोर 3 ऑगस्टला उपस्थित रहावे, असे समन्स काढण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांचा आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अत्यंत अश्लाघ्य, बिभत्स आणि अश्लील शब्दांमध्ये टिप्पणी आंदोलनात सहभागी झालेल्या काही विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून करण्यात आल्या होत्या. या सर्व प्रकारांचे व्हिडीओ चित्रण झाले असून ते सध्या विविध समाजमाध्यमावरुन प्रसारित होत आहे. हे सर्व चित्रण काढून घेण्यात यावे, असे दिशानिर्देश दिल्ली पोलिसांनी ‘मेटा’ला दिले आहेत. तसेच अशा पोस्ट टाकणाऱ्यांचे पत्ते, फोनक्रमांक आणि व्यक्तीगत माहिती द्या, असा आदेशही दिला.

इतर विषयांवरही चर्चा शक्य

या बैठकीत इतर इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार संबंधी इतर महत्वाच्या विषयांवरही चर्चा होईल, अशी माहिती देण्यात आली. या विषयांसंबंधी केंद्र सरकारचे धोरण हाही चर्चेचा एक विषय असेल. ही समिती सोशल मिडिया नियंत्रणासंबंधी आपली भूमिका येत्या काही काळात स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

‘रील’ला अभूतपूर्व प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जुलैला पोस्ट केलेल्या रीलला अतिप्रचंड आणि विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. रील पोस्ट केल्यापासून पहिल्या 24 तासांमध्ये ते भारतातील 34 कोटी लोकांनी पाहिले. तसेच त्याला जवळपास 4 कोटी लाईक्स मिळाले. याच काळात त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येमध्येही 15 लाखांची वाढ झाली असून हा एक जागतिक विक्रम आहे, असे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

डिजिटल सार्वभौमत्व महत्वाचे

ड पंतप्रधान मोदी यांची लोकप्रिय पोस्ट हटविल्याने भारतात संतापाची भावना

ड या पोस्टला मिळत आहे विक्रमी प्रतिसाद, फॉलोअर्सच्या संख्येतही मोठी वाढ

ड अनेक सोशल मिडिया कंपन्यांच्या प्रमुखांना सांसदीय समितीकडून समन्स

Advertisement
Tags :

.