मोदींच्या व्हिडिओप्रकरणी मेटाने मागितली माफी
चूक झाल्याची कबुली : संसदीय समितीने दिला होता अल्टीमेटम
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मेटाचे ग्लोबल अफेयर्स चीफ जोएल कापलान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटविण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी माफी मागितली तसेच पुढील काळात असे घडू नये म्हणून व्यवस्थेत सुधारणा करण्याचा विश्वास दिला आहे. या तांत्रिक चुकीसाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत मेटाच्या वतीने माफी मागण्यात आल्याचे कापलान यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका फेसबुक व्हिडिओला काही काळासाठी हटविण्याचे प्रकरण आता संसदेच्या स्थायी समितीपर्यंत पोहोचले होते. समितीने मेटाचे सीईओ मार्क जकरबर्ग यांना तीन दिवसांच्या आत माफी मागण्यास सांगितले होते. तसेच माफी न मागितल्यास कंपनीच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस केली जाऊ शकते असा इशारा दिला होता.
जुलै महिन्यात पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ फेसबुकवर काही काळासाठी दिसणे बंद झाला होता. व्हिडिओत पंतप्रधान विद्यार्थी अन् पेपर लीक या मुद्द्यांवर बोलत होते. काही वेळानंतर मेटाने व्हिडिओ पुन्हा दाखविण्यास सुरुवात केली होती. तसेच यामागे तांत्रिक चूक कारणीभूत होती असा दावा केला होता. कंपनीने याप्रकरणी खेदही व्यक्त केला होता.
संसदेच्या दूरसंचार अन् माहिती-तंत्रज्ञानाशी निगडित स्थायी समितीने आता या प्रकरणाला गंभीर मानले होते. समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी कंपनीकडून देण्यात आलेला सामान्य माफीनामा पुरेसा नसल्याचे सांगितले आहे. मेटाचे सीईओ मार्क जकरबर्गने स्वत: माफी मागावी असे म्हणत समितीने तीन दिवसांची मुदत दिली होती.
सेफ हार्बर प्रोटेक्शन
मेटाने माफी न मागितल्यास कंपनीवर कारवाई होईल असे संसदीय समितीने स्पष्ट केले होते. कारवाईच्या नावावर कंपनीच्या सेफ हार्बर प्रोटेक्शनच्या समीक्षेची शिफारस केली जाण्याची दाट शक्यता होती. व्हिडिओ अखेर का हटला आणि कंपनीच्या कंटेंट मॉडरेशन सिस्टीममध्ये अशी मोठी चूक कशी घडली हे समजून घेणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते.
अन्य प्रकरणी मागितली माफी
मेटाचे सीईओ मार्क जकरबर्ग यांनी स्वत:च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बाल लैंगिक शोषण सामग्री, डीपफेक अन् अल्गोरिदम संचालनात झालेल्या गंभीर चुकीसाठी अधिकृत स्वरुपात माफी मागितली आहे. काही खास प्रकारच्या कंटेंटला बूस्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च करण्यात आल्याचे कंपनीने मान्य केले आहे.