For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिक्षक भरतीसंदर्भात मुख्य सचिवांची घेतली भेट

06:21 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिक्षक भरतीसंदर्भात मुख्य सचिवांची घेतली भेट
Advertisement

मराठी विषय शिक्षकांचा समावेश करण्याची केली मागणी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

कर्नाटक सरकारकडून जाहीर केलेल्या शिक्षक भरतीमध्ये मराठी विषय शिक्षकांचाही समावेश करावा, या मागणीसाठी मंगळवारी रात्री काही मराठी उमेदवारांनी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. रश्मी महेश यांची भेट घेतली. कन्नडसोबत मराठी विषयाचाही समावेश करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांच्याकडे करण्यात आली.

Advertisement

राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच अधिसूचना जारी करण्यात आली. पण यामध्ये केवळ कन्नड विषय शिक्षकांचाच समावेश असल्याचे दिसून आले आहे. मराठीसह ऊर्दू व इतर भाषा शिक्षकांची पदे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे मराठी उमेदवारांनी बेंगळूरमध्ये जाऊन शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती करून दिली आहे.

कर्नाटक सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. रश्मी महेश यांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांना ऊर्दू व मराठी माध्यमाच्या रिक्त जागा व शिक्षक भरतीमध्ये या भाषा शिक्षकांचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी गजानन बावकर, दत्तात्रय धनगर, मोहन पाटील, दामोदर पाटील, सागर जाधव, विश्वनाथ कुलम यांच्यासह इतर उमेदवार उपस्थित होते.

बिदरमधील मराठी उमेदवारांची न्यायालयात धाव

केवळ बेळगाव जिल्हाच नाही तर संपूर्ण सीमावर्ती भागात शिक्षक भरतीतून अन्याय करण्यात आला आहे. बिदर, भालकी या परिसरात मराठी विषय शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असतानाही शिक्षक भरतीत मराठीला स्थान देण्यात आले नाही. याबाबत नुकतीच एक व्यापक बैठक अवराद येथे पार पडली. या बैठकीमध्ये मराठीसह ऊर्दू अल्पसंख्याक भाषांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. याला बिदर जिल्ह्यातील अनेक मराठी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

Advertisement
Tags :

.