म. ए. समितीची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
महामेळावा परवानगीबाबत निवेदन : दोन दिवसात कळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेण्याचा निर्धार
बेळगाव : येत्या 9 डिसेंबरपासून कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. याच दिवशी म. ए. समितीतर्फे महामेळावा (महाअधिवेशन) भरविला जाणार आहे. या महामेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी म. ए. समितीतर्फे गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत चर्चा करून कळविण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र दुसरीकडे परवानगी मिळो अगर न मिळो महामेळावा घेण्याचा निर्धार समितीने केला आहे. मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी वेळोवेळी आयोजित करण्यात येणारी आंदोलने, मोर्चे आणि महामेळाव्यांना परवानगी नाकारली जाते. मात्र आजपर्यंत अनेक आंदोलने, मोर्चे आणि महामेळावे यशस्वी झाले आहेत.
त्याप्रमाणे येत्या 9 डिसेंबर रोजी कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाविरोधात महामेळावा घेऊन तो यशस्वी करण्याचा निर्धार समितीने केला आहे. त्यासाठी येत्या 9 रोजी होणाऱ्या महामेळाव्याला (महाअधिवेशन) परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनाही निवेदन देण्यात आले आहे. यंदाचा महामेळावा छत्रपती शिवाजी उद्यान, छत्रपती संभाजी उद्यान, धर्मवीर संभाजी चौक यापैकी एका ठिकाणी घेतला जाणार आहे, अशी माहिती समिती नेत्यांनी दिली. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, अॅड. एम. जी. पाटील, रामचंद्र मोदगेकर, आर. के. पाटील, मनोहर हुंदरे, बी. डी. मोहनगेकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रण
म. ए. समितीतर्फे 9 डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. आमंत्रण स्वीकारून महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी स्वत:च्या पक्षातील एका नेत्याला पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.
घटक समितीमार्फत जागृती
9 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्याबाबत घटक समित्यांची बैठक घेऊन जागृती केली जात आहे. शिवाय येत्या दोन दिवसांत शहर आणि तालुका म. ए. समितीची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे.