बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यासाठी समिती आक्रमक
सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन : 10 नोव्हेंबरची डेडलाईन, अन्यथा रास्तारोकोचा इशारा
बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहने चालविणे जीवघेणे बनले आहे. कित्येकवेळा निवेदन देऊनदेखील याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत रस्त्याची दुरुस्ती व नूतनीकरण न झाल्यास रास्तारोको करून तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे, असा इशारा तालुका म. ए. समितीतर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता शशिकांत कोळेकर व संजय गस्ती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील बाचीपर्यंतच्या रस्त्याची पूर्णत: वाताहत झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहने चालविणे धोक्याचे बनले आहे. याबाबत तालुका म. ए. समितीतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देऊन जागे करण्यात आले होते. शिवाय या मार्गावर आंदोलनही छेडण्यात आले होते. मात्र अद्याप खात्याचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या मार्गावर अरगन तलाव, विनायक मंदिर, सुळगा, बेळगुंदी क्रॉस, तुरमुरी आणि बाची गावाजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत.
दरम्यान ‘रस्त्यात खड्डे, की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी लहान-सहान अपघात घडू लागले आहेत. यंदा झालेल्या पावसाने रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. त्यामुळे अशा मार्गावरून वाहने चालविणे धोक्याचे बनले आहे. तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे. सावगाव, उचगाव-कोवाड रोड, बडस, बेळवट्टी आदी भागातील रस्तेही खराब झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल होऊ लागले आहेत. तातडीने बेळगाव-वेंगुर्ला मार्गासह तालुक्यातील रस्त्यांची 10 नोव्हेंबरपर्यंत दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा तालुका म. ए. समितीतर्फे देण्यात आला आहे. यावेळी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, माजी जि. पं. सदस्य रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर, आर. एम. चौगुले, आर. के. पाटील, मोनाप्पा पाटील, विठ्ठल पाटील, बी. डी. मोहनगेकर, मोनाप्पा संताजी, मल्लाप्पा गुरव, अनिल पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हेते.