सोनी झी यांच्यातील विलिनीकरण रद्द होण्याची शक्यता
नवी दिल्ली
सोनी आणि झी एंटरटेनमेंट यांच्यातील विलिनीकरणाची योजना रद्द होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या बातमीनंतर झी एंटरटेनमेंटचा समभाग मोठ्या प्रमाणात शेअरबाजारात घसरणीत असताना दिसला आहे.
अर्थात याबाबतीत अधिकृतरित्या कबुली मात्र कंपन्यांकडून देण्यात आलेली नाही. दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत असून 20 जानेवारीच्या आधी याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सोनी आणि झी यांच्यातील विलिनीकरणाची योजना रद्द होणार असल्याच्या बातमीने शेअरबाजारात मंगळवारी परिणाम घडवून आणला.
समभाग घसरणीत
झी एंटरटेनमेंटचे समभाग सकाळच्या सत्रात 10 टक्के इतके घसरणीत राहिले होते. 249 रुपयांवर हा समभाग सकाळी खुला झाला, याआधीच्या सत्रात समभाग 277 रुपये भावावर बंद झाला होता. ब्लूमबर्गने यासंबंधीची माहिती दिली होती. त्यांनी सोनी समूह झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेससोबत विलिनीकरणाची योजना रद्द करण्याबाबत विचार करत असल्याचे म्हटले होते. सकाळी 10.50 मिनीटांनी समभाग 9.97 टक्के किंवा 27 रुपयांनी घसरत 249 भावावर घसरला होता. सोनी समूह हे विलिनीकरण रद्द करण्याचा विचार करत असल्याचे ब्लूमबर्गने म्हटले आहे.
सीईओ गोयंकांची भूमिका
याचदरम्यान या गोंधळामुळे पुनीत गोयंका हे मग सीईओ राहणार की नाही याबाबत शंका वाढू लागल्या आहेत. पुनीत गोयंका हे झी एंटरटेनमेंटचे संस्थापक सुभाष चंद्रा यांचे पुत्र आहेत. सोनी समूहाला विलिनीकरणानंतर गोयंका यांना सीईओ पदावर ठेवायचे नाही आहे, असेही कळते. विलिनीकरणाचा घोळ जोवर संपत नाही तोवर गोयंका यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह कायम असणार आहे.