विलीनीकरण राष्ट्रवादीचे, लाभ भाजपचे !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण व्हावे, या उद्देशाने सध्या महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी चालू आहेत. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला बराच मोठा धक्का बसलेला आहे. शरद पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य आधारस्तंभ आहे यात शंका नाही, परंतु त्यांचे आता वय झालेले आहे आणि ते वारंवार आजारी पडत आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्रीपदी राहून राष्ट्रवादीचा गाडा हाकणारे लोकप्रिय नेते अजित पवार हेच राष्ट्रवादीचे भवितव्य असे सर्वत्र बोलले जात होते, परंतु गेल्या महिन्यात त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर अनंत अडचणी निर्माण झाल्या. अजित पवार यांनी शरद पवार गटाकडे चर्चा करून दोन्ही गटांचे विलीनीकरण करण्याचे ठरविले होते, अशा पद्धतीच्या बातम्या अलीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांकडून उघड होत होत्या. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्तेमध्ये राहून देखील अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाकडे थोडीफार फारकत घेऊन पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे आघाडी केली होती, त्यात अजित पवार यांना कुठेही फायदा झाला नाही. उलट पक्षी त्यांच्या हातातील पुण्यातील सत्ता देखील निघून गेली होती. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली, मात्र अजितदादांची सहानुभूती विचारात घेऊन त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपद घालण्यात आलं आणि आपल्या पतीच्या निधनानंतर अचानक तिसऱ्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर सुनेत्रा पवार यांनी हे पद स्वीकारले. प्रत्यक्षात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद जरी स्वीकारले आणि शपथग्रहण केले, तरीदेखील अजित पवार यांच्या निधनाच्या बारा दिवसानंतर सुनेत्राताईंनी मंगळवारी उपमुख्यमंत्रीपदाचा मंत्रालयात जाऊन ताबा घेतला. एवढेच नाही तर मंत्रिमंडळाच्या बैठकीस देखील त्या उपस्थित राहिल्या. राष्ट्रवादीचा गाडा हाकण्याचा प्रयत्न त्यांनी जरी केला असला तरी देखील प्रत्यक्षात पक्षातील काही गोष्टी या जागेवर पडणे आवश्यक होत्या. राष्ट्रवादीमधील दोन गट जे दोन्ही पवारांच्याच हाती आहेत व एकाच घराण्याच्या बाजूने आहेत त्या दोन्ही गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सध्या दोन्ही गटांतून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या भविष्याची चिंता आहे. शरद पवार हे जरी भक्कम नेतृत्व असले तरी त्यांचे आता वय झालेले आहे. त्यामुळेच आता यापुढे राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणी करावे, कसे करावे आणि आपसात भांडण करण्यापेक्षा एकत्र येणे हाच योग्य पर्याय असे दोन्ही गटाला वाटू लागले आहे. शरद पवार यांचा गट हा काँग्रेस पक्षाच्या आघाडीबरोबर तसेच उद्धव ठाकरेंच्या उबाठा शिवसेनेबरोबर आहे. हा पक्ष भाजपबरोबर नाही. त्यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर सुनेत्राताईंनी जाणे हे भाजपला निश्चितच पसंत पडणार नाही. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्याच्या हालचाली महाराष्ट्रात चालू आहेत त्या आता दिल्लीपर्यंत पोहोचल्या आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांनी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची दारे ठोठावली. सुनेत्राताईनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची नवी दिल्ली भेट घेतली. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नवी दिल्लीत भाजप नेत्यांबरोबर बैठक घेतली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होत असेल तर त्याबाबत सविस्तर खुलासा भाजपकडे करणे आवश्यक आहे, असे यापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नवी दिल्लीत भाजप नेत्यांबरोबर चर्चा केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या हाती सोपवला की काय, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू होतील. प्रत्यक्षात पक्षाचा सर्वोच्च नेता गेल्यानंतर पक्षातील इतर नेत्यांमध्ये जी चलबिचल होते तीच चलबिचल सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये झालेली आहे. शरद पवार गट हा महायुतीसमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निष्प्रभ ठरला. त्यामुळेच या पक्षातील अनेक नेत्यांना आपल्या पक्षाचे भविष्यात काय होईल, याची देखील निश्चितच चिंता आहे. कारण पक्षाची पाळेमुळे नाहीशी होत चालली आहे. अशावेळी अजित पवार गट मात्र फार सक्रिय झालेला आहे आणि शिवसेना उबाठाबरोबर जाऊन शरद पवार गटाला भविष्यात फारसे काही साध्य होणे शक्य नाही. त्यामुळेच केंद्रातील सत्तेबरोबर जाणे हा सर्व दृष्टिकोनातून फायदा जसा शरद पवार गटाला आहे, तसाच तो केंद्रातील भाजप सरकारला देखील आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील विलीनीकरण ही गेष्ट महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारणासाठी फार महत्त्वाची ठरू शकते. या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणे, याशिवाय त्या पक्षाला दुसरा पर्याय नाही. मात्र एकाचवेळी पक्ष सत्तेतही राहतो आणि दुसऱ्या बाजूने विरोधी पक्षाबरोबर राहणे हे शक्य होणार नाही. त्यामुळे दोन होड्यांवर पाय ठेवून उभे राहणे हे कोणालाही जसे परवडत नाही तसेच राष्ट्रवादीला तर ते मुळीच परवडणार नाही. एक तर भाजपबरोबर सत्तेत राहणे अन्यथा सत्तेतून बाहेर पडणे हाच पर्याय आहे. पण सध्याच्या स्थितीमध्ये सत्तेतून बाहेर पडणे हे अजित पवार गटाला मुळीच परवडणार नाही. दोन्ही गटांचे विलीनीकरण ही तशी साधी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी त्या पक्षातील दोन्ही बाजूंच्या नेत्यांना विचार करावा लागेल. एक तर सत्तेत राहणे किंवा सत्तेतून बाहेर पडणे हे दोन पर्याय या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे फार मोठा फरक पडणार आहे. यातून खरा फटका बसेल तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला. दुसऱ्या बाजूने एकनाथ शिंदे सेनेचे महत्त्व देखील थोडे कमी होईल. अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी पक्षासमोर जो पेच निर्माण झालेला आहे त्यावर तोडगा भाजपच्या केंद्रीय पातळीवरील नेते काढू इच्छितात. जर शरद पवार गटाने भाजपला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पाठिंबा दिला तर केंद्रात विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसेल. सत्तेत राहणे कोणाला पसंत नाही! गेले काही दिवस सुप्रिया सुळे या केंद्र सरकारमध्ये सामील होणार, अशा आशयाच्या ज्या बातम्या प्रसारित झाल्या, त्या पूर्णत: चुकीच्या नाहीत असे म्हणण्यास काय हरकत आहे ! सध्याच्या हालचाली पाहता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण भाजपसाठी निश्चितच फायदेशीर आहे आणि राष्ट्रवादीसाठी तर सुवर्णसंधीच!