कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तापमानाचा पारा चाळीशी पार

12:04 PM Apr 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून कोल्हापूर जिह्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये तर तापमानात उच्चांकी वाढ झाली असून बुधवारी सरासरी 40 अंशांच्या पुढे गेले. वाढलेल्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे दुपारी 12 नंतर 3 वाजेपर्यंत शहरातील रस्ते ओस पडत आहेत. आरोग्याच्या तक्रारीत वाढ होत असून ताप, डोकेदुखीसह उष्माघात सदृश आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या असून उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement

पुढील काही दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरीकांकडून टोपी, गॉगलचा जास्तीतजास्त वापर केला जात आहे. तसेच कोल्ड्रींक्स्, रस, आईक्रीम आदी गार पेयांच्या माध्यमातून शरिराला जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवतात. 11 वाजल्यापासून पुढे सायंकाळी 5 वाजेपर्यंत तापमानाचा पारा कायम राहतो.

उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शेती कामावरही मोठा परिणाम झाला आहे. दुपारच्या कालावधीत शेतामध्ये काम करणे मुश्किल बनले आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हाची झळ मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे सकाळी व सायंकाळी अशा दोन टप्यात शेतीकाम केले जात आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे आठ ते दहा दिवसांमध्ये पिकांना सिंचनाची सोय करावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.

सध्या सकाळची शाळा सुरू असल्यामुळे शाळकरी मुले दुपारच्या कालावधीत नदी, विहीर, तलावाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने दिसत आहेत. उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी मुलांकडून तासनतास पाण्यातच खेळ मांडला जात आहे. पण आजतागायत नदी, विहीरीमध्ये पोहताना अनेक दुर्घटना घडल्याचे चित्र आहे. पोहता येत नसलेल्या मुलांच्या जिवितास धोका असल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसोबत जाण्याची आवश्यकता आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची तसेच प्रसंगी शारिरीक ताण पडून मृत्यू ओढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघात होऊ नये यासाठी आतापासून जागरुक राहिले पाहिजे. रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी कोल्हापूर जिह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र स्तरावर प्रथमोपचार व उष्माघात नियंत्रणाच्या अनुषंगाने आवश्यक्त औषधी व साहित्य सामग्री सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. जिह्यातील सर्व प्राथमिक केंद्रामध्ये उष्माघात कक्ष स्थापन करणेत आलेले आहेत.

थकवा येणे. ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता. बेशद्धावस्था आदी उष्माघाताची लक्षणे आहेत.

उष्माघात टाळण्यासाठी उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत, जेवणामध्ये शक्यतो शाकाहारी आहाराचा वापर करावा तहान नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी प्या. उन्हात काम करताना ओल्या कपडचांनी डोके मान, चेहरा झाकावा हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. ओआरएस. लिंबू पाणी. ताक यांचा नियमित वापर करा सुर्यप्रकाशचा थेट संबंध टाळावा पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा, वेळोवेळी थंड पाण्याने अंघोळ करावी. कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आपले घर थंड ठेवा पडदे, झडपा सनशेड बसवा गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे, असे जि.. आरोग्य विभागाने सूचित केले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article