इराणच्या गावात 82.2 अंशावर पारा
पृथ्वीवरील सर्वाधिक उष्णता : सर्व विक्रम निघाले मोडीत
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणचे एक गाव होरपळत आहे. येथील तापमान केंद्राने 28 ऑगस्ट रोजी 82.2 अंश तापमानाची नोंद केली आहे. पृथ्वीवर सर्वाधिक नोंद करण्यात आलेले हे तापमान ठरले आहे. अमेरिकेचे हवामानतज्ञ कॉलिन मॅकार्थी यांनी एक्सवर यासंबंधी माहिती दिली आहे. परंतु त्यांनी या तापमाननोंदीवर साशंकताही व्यक्त केली आहे, याप्रकरणी अधिकृत तपासणीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इराणच्या दक्षिण किनाऱ्यावरील डेरेस्टन वायुतळानजीक असलेल्या हवामान केंद्राने 28 ऑगस्ट रोजी 180 फॅरेनहाइट डिग्री (82.2 सेल्सिअस)चे तपामन आणि 97 फॅरेनहाइट डिग्री (36.1 सेल्सिअस)चा ओस बिंदू नोंदविला आहे. या घटनेने पूर्ण जगातील हवामानतज्ञांची चिंता वाढली आहे. ओस बिंदू असे तापमान असते, जेथे हवा आर्द्रता रोखून धरू शकत नाही. 40 ते 54 अंश सेल्सिअसच्या तापमानात दीर्घकाळ राहिल्याने उष्माघाताचा धोका वाढत असतो.
पश्चिम आशियात उष्मालाट
अमेरिकेचे हवामानतज्ञ मॅकार्थी यांच्यानुसार पश्चिम आशियात अत्यंत चिंताजनक उष्मालाट निर्माण झाली आहे. सौदी अरेबियाच्या धाहरनमध्ये असलेल्या हवामान केंद्राने 93 फॅरेनहाइट डिग्री (33.9 अंश सेल्सिअस)पर्यंतचा ओसबिंदू नोंदविला आहे. पश्चिम आशियाच्या अनेक क्षेत्रांमध्ये तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.