लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दीर्घकाळ अत्याचार; पणजी महिला पोलिस ठाण्यात जिम मालकाविरुद्ध गुन्हा, संशयित पसार
पणजी : लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मेरशी येथील एका जिम मालकाविरोधात पणजी महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच संशयित पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला आणि संशयित जिम मालकाची मेरशी येथील जिममध्ये ओळख झाली होती. त्यानंतर संशयिताने तिच्याशी जवळीक वाढवून लग्नाचा प्रस्ताव ठेवला. लग्नाचे आमिष दाखवून त्याने महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर तिने संशयिताकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, त्याने लग्नास नकार देत तिला धमकावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने पणजी महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संशयित जिम मालकाविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, न्यायालयात तिचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या संशयिताचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.