मर्सिडीजचा जॉर्ज रसेल ऑस्ट्रियात विजेता
रेड बुलचा व्हर्स्टापेन दुसरा, मर्सिडीजचा अँटोनेली तिसरा
वृत्तसंस्था, स्पीलबर्ग, ऑस्ट्रिया
मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने येथे झालेल्या ऑस्ट्रियन ग्र्रां प्रि फॉर्मुला वन शर्यतीचे जेतेपद पटकावले. त्याचाच संघसहकारी किमी अँटोनेलीने तिसरे तर रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरे स्थान मिळविले. रसेलला 25, व्हर्स्टापेनला 18 तर अँटोनेलीला 15 गुण मिळाले. या जेतेपदामुळे रसेलच्या जेतेपदाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
उष्णतेचा आणि बिघडलेल्या ड्रिंक्स सिस्टीमवर मात करीत रसेलने ही शर्यत जिंकली. स्प्रिंट शर्यती वगळता सुरुवातीच्या ऑस्ट्रेलियन ग्रां प्रि नंतरचे त्याचे हे पहिले जेतेपद आहे. शर्यत संपताना पहिल्या तीन स्पर्धकांमध्ये केवळ दोन सेकंदांचे अंतर होते. मॅक्लारेनच्या ऑस्कर पियास्ट्रीने चौथे, फेरारीच्या लेविस हॅमिल्टनने पाचवे, रेड बुलच्या इसाक हजदरने सहावे, मॅक्लारेनच्या लँडो नॉरिसने सातवे, फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने आठवे, रेसिंग बुलच्या लियाम लॉसनने नववे व रेसिंग बुलच्याच अरविद लिंडब्लाडने शेवटचे दहावे स्थान मिळाले.