मर्सिडीज बेंझ इंडिया 12 नव्या कार्स आणणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी मर्सिडीज बेंझ इंडिया आगामी काळामध्ये 12 नव्या कार मॉडेलचे सादरीकरण करण्याची योजना बनवत आहे. त्याचप्रमाणे विकासदेखील दुहेरी अंकामध्ये साधण्याचे नियोजन करत आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर यांनी ही माहिती दिली आहे. 2023 मध्ये कंपनीने 17,408 गाड्यांची विक्री केली आहे. हा देखील एक नवा विक्रम असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यावर्षी वाहनांची दुप्पट विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावर्षी कंपनी बाजारामध्ये 12 नव्या कार मॉडेल्सचे सादरीकरण करणार आहे. जर्मनीमधील ही मूळची कंपनी भारतातील कार बाजारामध्ये लक्झरी गटामध्ये आघाडी घेणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. 2022 मध्ये कंपनीने 15,822 कार्सची विक्री केली होती. 2022 च्या तुलनेमध्ये 2023 मध्ये विक्रीमध्ये 41 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. दुसरीकडे मर्सिडीज बेंझ इंडिया कंपनीने एसयूव्ही गटातील कार्स लॉन्च करण्यासंदर्भात आघाडी घेतली आहे. या अंतर्गत कंपनीने जीएलएस हे नवे मॉडेल सादर केले आहे. दुसरीकडे कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा विचार करता 2022 ते 2023 यादरम्यान तीनपट वाढ नोंदवली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारामध्ये आपला वाटा 4 टक्के इतका वाढला असल्याचेही सीईओंनी म्हटले आहे.