मर्सिडीज-बेंझ इंडियाकडून प्रत्येक तिमाहीत दर वाढविण्याचे संकेत
2026 पासून कंपनी हा बदल करण्याची शक्यता
नवी दिल्ली :
लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझ इंडिया 2026 मध्ये तिमाहीत किंमतीत वाढ करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. युरोच्या तुलनेत रुपयात सतत घसरण होण्याचा परिणाम कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संतोष अय्यर म्हणाले की कंपनीने यापूर्वी 1 जानेवारी 2026 पासून सुमारे 2 टक्के किंमत वाढ जाहीर केली होती. त्यानंतरही, वर्षभर टप्प्याटप्प्याने किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते. ‘फिक्की मर्सिडीज बेंझ इंडिया इनोव्हेशन बिझनेस आयडिया चॅलेंज प्रोग्राम’ लाँचच्या निमित्ताने संतोष अय्यर यांनी वरील माहिती दिली.
युरोच्या तुलनेत रुपया कमकुवत
संतोष अय्यर म्हणाले की, 2025 मध्ये युरो-रुपया विनिमय दर सातत्याने 100 रुपयांच्या वर राहिला आहे, जो त्याच्या ऐतिहासिक सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. ते म्हणाले की, सुमारे 18 महिन्यांपूर्वी 1 युरोची किंमत 89 रुपये होती, जी आता सुमारे 104-105 रुपयांपर्यंत वाढली आहे. याचा अर्थ असा की रुपया 15 ते 18 टक्क्यांहून अधिक घसरला आहे, ज्याचा थेट परिणाम कंपनीच्या खर्चावर होत आहे.
किंमत वाढवल्याने मागणीवर परिणाम शक्य
अय्यर म्हणाले की, रुपयाचे घसरणे आणि आतापर्यंतच्या किमतींमध्ये वाढ यामध्ये अजूनही 10-15 टक्क्यांचे अंतर आहे. त्यांनी स्पष्ट केले की जर संपूर्ण वाढ एकाच वेळी केली तर त्याचा कारच्या मागणीवर परिणाम होईल. यामुळे, कंपनी तिमाही आधारावर हळूहळू किमती वाढवण्याची योजना आखत आहे. 2026 पर्यंत प्रत्येक तिमाहीत किमती किती वाढतील हे कंपनीने अद्याप ठरवलेले नसले तरी, दर तिमाहीत ही वाढ सुमारे 2 टक्के असू शकते असे संकेत देण्यात आले आहेत.
मर्सिडीजने 3 वेळा किमती वाढवल्या
परकीय चलन दरात चढ-उतार आणि इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे, मर्सिडीजने यावर्षी 3 वेळा किमती वाढवल्या आहेत. उद्योग सूत्रांनी सांगितले की, उत्पादकांनी जीएसटी दरांमध्ये कपातीचा फायदा ग्राहकांना पूर्णपणे दिला आहे. काही महिन्यांसाठी किमती वाढ थांबवण्यात आली होती, परंतु बहुतेक ब्रँड 2026 च्या सुरुवातीला किमती वाढवण्याचा निर्णय घेतील. कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुमारे 95 टक्के सेमीकंडक्टर चिप्स (विशेषत: महागड्या कार ज्यामध्ये अधिक इलेक्ट्रॉनिक वैशिष्ट्यो आहेत) तैवान, चीन आणि दक्षिण कोरिया सारख्या देशांमधून आयात केल्या जातात.