मर्सिडीज बेंझची भारतात विक्रमी कामगिरी
2024 मध्ये 19565 कार्सची विक्री : आतापर्यंतचे सर्वोत्तम वर्ष
वृत्तसंस्था/ पुणे
मर्सिडीज बेंझ इंडिया यांनी 2024 मध्ये कार विक्रीमध्ये सर्वोत्तम कामगिरी पार पाडली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता 2024 मधील विक्री सर्वाधिक मानली जात आहे. यापूर्वीच्या विविध कॅलेंडर वर्षांसोबत मागच्या वर्षाचा विचार केल्यास 2024 चे कॅलेंडर वर्ष हे कंपनीसाठी नोंदणीय असेच ठरले आहे.
2024 मध्ये कंपनीने 19565 कारची विक्री करण्यामध्ये यश मिळवले आहे. वर्षाच्या आधारावर कार विक्रीमध्ये 12 टक्के वाढ नोंदवली आहे. 2024 मध्ये पाहता प्रत्येक महिन्याला सरासरी 1630 कार्स विकल्या गेल्या आहेत. एन्ट्री, कोर आणि टॉपएंड प्रकारातील लक्झरी कार्सना चांगली मागणी राहिली होती.
2022, 2023 मधील कामगिरी
2023 वर्षात मर्सिडीज बेंझ इंडिया यांनी भारतात 17408 कार्स विक्री केल्या होत्या. 2023 मध्ये सरासरी महिन्याला 1451 कारची विक्री झाली होती. 2022 मध्ये 15822 कारची विक्री कंपनीने केली होती. त्यावर्षी दर महिन्याला सरासरी 1319 कारची विक्री केली गेली होती. कंपनीच्या इक्यूएस एसयूव्ही कारला ग्राहकांनी चांगली मागणी नोंदवली आहे. यासोबतच बीईव्ही या गटात सुद्धा कंपनीने बाजारात सर्वाधिक हिस्सा मिळवण्यामध्ये यश मिळवले आहे.