मर्सिडीजचा अँटोनेली मियामी ग्रां प्रिमध्ये विजेता
वृत्तसंस्था
मियामी : इटलीचा युवा ड्रायव्हर किमी अँटोनेलीने येथे झालेल्या मियामी ग्रां प्रि फॉर्मुला वन शर्यतीत मर्सिडीजला विजेतेपद मिळवून दिले. त्याने सलग तिसरी शर्यत जिंकून चॅम्पियनशिपमध्ये आपली आघाडी 20 गुणांनी वाढविली. मॅक्लारेनच्या लँडो नोरिसने दुसरे तर त्याचाच संघसहकारी ऑस्कर पियास्ट्रीने तिसरे स्थान मिळविले.
19 वर्षीय अँटोनेली हा आघाडीचे स्थान मिळवित सर्वात युवा ड्रायव्हर बनून नवा इतिहास रचला आहे. त्याने सलग तीन शर्यती पोल पोझिशनवरूनच जिंकल्या आहेत. याशिवाय मियामीमध्ये फ्रंट रो वरून जिंकणारा पाच शर्यतीतील तो पहिलाच चालक बनला आहे. शनिवारी झालेल्या स्प्रिंट रेसमध्ये नोरिसने जेतेपद मिळविले होते. रविवारच्या शर्यतीत तो अँटोनेलीपेक्षा तीन सेकंदांनी पुढे होता. पण पिट स्टॉपनंतर त्याला ही आघाडी गमवावी लागली. अखेर त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मॅक्लारेनच्या पियास्ट्रीने गेल्या वर्षी येथील शर्यत जिंकली होती. पण यावेळी तिसरे स्थान मिळाले. अँटोनेलीचे 100, रसेलचे 80, लेक्लर्कचे 59 तर नोरिसचे 51 गुण झाले आहेत.
मर्सिडीजचा जॉर्ज रसेलने चौथे, रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने पाचवे, फेरारीच्या लुईस हॅमिल्टनने सहावे, अल्पाईनच्या फ्रँको कोलापिंटोने सातवे, फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने आठवे, विल्यम्सच्या कार्लोस सेन्झ ज्युनियरने नववे व विल्यम्सच्याच अॅलेन्स अल्बोनने दहावे स्थान मिळविले.