Breaking : रायगड जिल्ह्यात 106 कोटींचे मेफेड्रोन जप्त; बंद कंपनीआड चालले होते उत्पादन
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पोलिसांनी एका केमिकल कंपनीवर छापा टाकून 106 कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त केले आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खालापूर तालुक्यातील साजगाव येथील कंपनीवर हा छापा टाकला. या छाप्यात प्लास्टिकच्या अनेक ड्रममध्ये साठवलेले मेफेड्रोन सापडल्याची माहीती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या जप्तीनंतर संबंधीत कंपनी बंद करण्यात आली असून कमल जेसवानी (48), मतीन शेख (45) आणि अँथनी कुरुकुटिकरण या तीन व्यक्तींना प्रतिबंधित पदार्थ तयार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या तिघांविरुद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार प्लास्टिकच्या तीन ड्रममध्ये साठवून ठेवलेले एकूण 85.2 किलो मेफेड्रोन, दोन कंटेनरमध्ये प्रत्येकी 30 किलो आणि तिसऱ्या ड्रममध्ये 25.2 किलो असे एकूण 85.2 किलो मेफेड्रोन सापडले आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 106.50 कोटी रुपये असून, या अंमली पदार्थाच्या 1 किलो ची बाजारातील किंमत 1.25 कोटी रुपये आहे.
याशिवाय, पोलिसांनी 15. 37 लाख रुपये किमतीचा कच्चा माल आणि रसायने जप्त केली आहेत. या कच्च्या मालाचा वापर मेफेड्रोनच्या निर्मिती प्रक्रियेत केला जात होता. अधिका-याने पुढे सांगितले की, अशा प्रकारच्या उत्पादनात, वितरण आणि विक्रीशी संबंधित बेकायदेशीर गोष्टींमध्ये आणखी लोक गुंतले आहेत का याचा तपास वेगाने सुरु आहे.