प्रियकराकडून मानसिक आणि शारीरिक त्रास; शेवटी तृतीयपंथीयाने स्मशानभूमीत ओढणीच्या साहाय्याने केला आयुष्याचा शेवट
सोलापूर: प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून एका २१ वर्षीय तृतीयपंथीयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अभिजित ऊर्फ कोमल हरिबा नागटिळक (वय २१, रा. कोळी वस्ती, साई नगर, साखर कारखान्याजवळ, होटगी रोड, ता. दक्षिण सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे.
कोमलचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधातून गेल्या काही दिवसांपासून प्रियकराकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा आरोप कोमलच्या गुरूंनी केला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून कोमलने १९ सप्टेंबरच्या रात्री साखर कारखाना परिसरातील स्मशानभूमीत लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेचे वृत्त समजताच सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल परिसरात तृतीयपंथीय समाजातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून, संबंधित आरोपी प्रियकराची कसून चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तृतीयपंथीय समाजाकडून होत आहे. पोलीस तपासानंतरच या घटनेमागील सर्व सत्य समोर येईल.