For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुरुष संघ मुख्य फेरीत, महिला स्पर्धेबाहेर

06:37 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुरुष संघ मुख्य फेरीत  महिला स्पर्धेबाहेर
Advertisement

भारतीय महिलांचा मलेशियाकडून  16-13  गुणांनी पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ सिंगापूर

येथे सुरु असलेल्या एफआयबीए 3×3 आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत गुरुवारी मलेशियाकडून निर्णायक पराभव पत्करावा लागल्यामुळे, भारतीय महिला बास्केटबॉल संघाला स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आले.

Advertisement

जागतिक क्रमवारीत 88 व्या क्रमांकावर असलेल्या भारताला ब गटातील आपल्या पहिल्याच सामन्यात 44 व्या क्रमांकावर असलेल्या मलेशियाकडून 16-13 अशा गुणांनी पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या सुरुवातीला 6-4 अशी आघाडी मिळवूनही भारतीय संघ आपली लय कायम राखू शकला नाही, परिणामी मलेशियाने आघाडी घेत निर्णायक विजय आपल्या नावे केला. भारतासाठी पुष्पा सेंथिल कुमार ही सर्वात लक्षवेधी खेळाडू ठरली, जिने सर्वाधिक सहा गुणांची कमाई केली. तसेच दर्शिनी तिरुनावुक्कारासू हिनेही मोलाचे योगदान दिले, ज्यामध्ये आर्कच्या बाहेरुन मारलेल्या दोन यशस्वी बास्केटचा समावेश होता.

आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन केले आणि तुर्कमेनिस्तानवर 21-4 असा एकतर्फी व दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात श्रीकला राणी आणि पुष्पा यांनी प्रत्येकी सहा गुणांची कमाई करत गुणफलकात आघाडी घेतली तर दर्शिनीने पाच आणि संजना रमेशने चार गुणांचे योगदान देत संघाच्या  वर्चस्वपूर्ण कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली. तथापि, त्याच दिवशी नंतरच्या सत्रात मलेशियाने तुर्कमेनिस्तानाचा 21-9 असा पराभव करत या गटातून मुख्य फेरीत जाणारे एकमेव स्थान निश्चित केले. यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

पात्रता फेरीतील प्रत्येक गटातून केवळ अव्वल क्रमांकाचा संघच मुख्य फेरीत प्रवेश करतो, ही सलग दुसरी वेळ आहे, जेव्हा भारतीय महिला संघाला पात्रता फेरीच्या पलीकडे मजल मारण्यात अपयश आले आहे. मागील स्पर्धेत भारताने गुआमवर विजय मिळवला होता, परंतु हाँगकाँग आणि चायनीज तैपेई यांच्याकडून झालेल्या पराभवांमुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान लवकरच संपुष्टात आले होते.

याउलट भारतीय पुरुष संघाची कामगिरी अत्यंत यशस्वी ठरली. पात्रता फेरीच्या ड गटात बहरीन, कझाकस्तान आणि हॉंगकॉंग चीन यांच्यावर मिळवलेल्या प्रभावी विजयांच्या जोरावर त्यांनी मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी होणाऱ्या मुख्य फेरीतील सामन्यांमध्ये त्यांचा सामना कतार आणि न्यूझीलंड या संघांशी होणार आहे. मुख्य फेरीतील प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. जी गेल्या एका दशकातील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.

Advertisement
Tags :

.