मेन इन ब्लॅक मोठ्या पडद्यावर परतणार
विल स्मिथ पुन्हा होणार एजंट जे
हॉलिवूडची सुपरहिट सायन्स फिक्शन अॅक्शन फ्रेंचाइजी मेन इन ब्लॅकच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. विल स्मिथ एका नव्या मिशनसह सीरिजच्या पुढील चित्रपटात मोठ्या पडद्यावर परतणार आहेत. बॅड बॉयज फ्रेंचाइजीला रीबूट केल्यावर सोनी पिक्चर्स स्वत:चे लक्ष आणखी एक सर्वात मोठी हिट ‘मेन इन ब्लॅक’वर केंद्रीत करत आहे. नव्या ‘मेन इन ब्लॅक’ चित्रपटावर काम सुरू झाले असून याची कहाणी क्रिस ब्रेमर हे लेखक लिहिणार आहेत.
सोनी पिक्सर्चचा हा पुढील मोठा नॉस्टॅल्जिया-ड्रिवर चित्रपट असेल, ज्यात विल स्मिथला ‘एजंट जे’च्या रुपात परत आणले जाऊ शवपे. मेन इन ब्लॅक फ्रेंचाइजीचा मागील चित्रपट 2019 साली ‘मेन इन ब्लॅक : इंटरनॅशनल’ प्रदर्शित झाला होता. ज्यात क्रिस हेम्सवर्थ मुख्य भूमिकेत होता.
आतापर्यंत चार चित्रपट
मेन इन ब्लॅक सीरिजचा पहिला चित्रपट 1997 साली प्रदर्शित झाला होता, जो लोवेल कनिंघमच्या मालिबू/मार्वल कॉमिक बुक सीरिज ‘द मेन इन ब्लॅक‘वर आधारित होता. हा एक युएफओ कॉन्सपिरेसी थेअरीवर होता. फ्रेंचाइजीचा दुसरा चित्रपट ‘मेन इन ब्लॅक 2’ हा 2002 साली प्रदर्शित झाला होता. तर तिसरा चित्रपट ‘मेन इन ब्लॅक 3’ हा 2012 साली प्रदर्शित करण्यात आला होता. या तिन्ही चित्रपटांमध्ये विल स्मिथ होता. तर चौथा चित्रपट एक स्पिन-ऑफ होता आणि याला ‘मेन इन ब्लॅक : इंटरनॅशनल’ नावाने 2019 साली प्रदर्शित करण्यात आले होते.
विल स्मिथ मुख्य भूमिकेत?
मेन इन ब्लॅक 5 च्या कलाकारांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु सर्वप्रथम विल स्मिथसमोर पटकथा मांडली जाणार असल्याचे समजते. यामुळे विल स्मिथ यात भूमिका साकारणार असल्याचे मानले जातेय. परंतु तो मुख्य भूमिकेत असणार का सहाय्यक भूमिकेत हे स्पष्ट नाही.