विवाहानंतर पुरुषांना सोडावे लागते घर
महिलांचे असतात अनेक जोडीदार
जगरात अनेक समुदायांच्या अनोख्या प्रथा-परंपरा आहेत. भारतात मेघालय, आसाम आणि बांगलादेशच्या काही भागांमध्ये खासी समुदाय राहतो. सर्वसाधारणपणे या समुदायात मुलांपेक्षा मुलींना अधिक महत्त्व दिले जाते. खासी समुदायात परिवाराच्या सदस्यांचा भार पुरुषांच्या ऐवजी महिलांच्या खांद्यावर असतो. या समुदायात मुलींच्या जन्मानंतर जल्लोष केला जातो. खासी समुदायात मुलांना परक्याचे धन मानले जाते. तर मुली आणि मातांना देवासमान मानून परिवगरात सर्वात मोठा दर्जा दिला जातो. हा समुदाय पूर्णपणे मुलींना समर्पित आहे.
मुलीला मिळते अधिक संपत्ती
खासी समुदायात विवाहानंतर पुरुष पत्नीच्या घरी रहायला जातो. तर मुली आयुष्यभर स्वत:च्या आईवडिलांसोबत राहतात. तर मुलांना स्वत:चे घर सोडून सासरी रहावे लागते. याला खासी समुदायात अपमानास्पद मानले जात नाही. याचबरोबर या समुदायात वडिलोपार्जित संपत्ती मुलांऐवजी मुलींना मिळते. एकाहून अधिक मुली असल्यास सर्वात छोट्या मुलीला संपत्तीचा सर्वाधिक हिस्सा मिळतो. खासी समुदायात सर्वात छोट्या मुलीला सर्वाधिक संपत्ती मिळत असल्याने तिलाच आईवडिल, अविवाहित भावंडांची देखभाल करावी लागते.
बहुविवाहाची सूट
खासी समुदायात महिलांना अनेक विवाह करण्याची अनुमती आहे. येथील पुरुषांनी अनेकदा ही प्रथा बदलण्याची मागणी केली आहे. या समुदायात परिवाराचे सर्व निर्णय महिलाच घेतात. येथील बाजारपेठ देखील महिलांकडून चालविली जाते. या समुदायात छोट्या मुलीचे घर प्रत्येक नातेवाईकासाठी नेहमी खुले असते. छोट्या मुलीला खातडुह म्हटले जोत. मेघालयाच्या गारो, खासी, जयंतिया समुदायांमध्ये मातृसत्तात्मक व्यवस्था असते.
घटस्फोटानंतर...
खासी समुदायात विवाहासाठी कुठलाच खास विधी नसतो. युवती आणि आईवडिलांची सहमती प्राप्त झाल्यावर युवक सासरी ये-जा तसेच राहण्यास सुरू करतो. यानंतर अपत्य होताच युवक कायमस्वरुपी सासरी राहण्यास सुरुवात करतो. काही खासी लोक विवाहानंतर युवतीच्या घरी राहण्यास सुरुवात करतात. विवाहापूर्वी मुलाच्या कमाईवर आईवडिलांचा तर विवाहानंतर सासरच्यांचा अधिकार असतो. विवाह संपुष्टात आणणे देखील सोपे असते, परंतु घटस्फोटानंतर अपत्यावर वडिलांचा कुठलाही अधिकार नसतो.
आईचे आडनाव लावण्याची प्रथा
खासी समुदायात मुलांना आईकडून आडनाव प्राप्त होते. दीर्घकाळापूर्वी या समुदायाचे पुरुष युद्धावर गेले होते आणि मागे केवळ महिला राहिल्या होत्या. यामुळे महिलांनी स्वत:च्या मुलांना स्वत:चे नाव दिले होते असे काही लोकांचे सांगणे आहे. तर खासी महिलांचे अनेक जोडीदार असल्याने ही परंपरा सुरू झाल्याचे काही लोकांचे मानणे आहे.