या मंदिरात ‘पुरुष’ निषिद्ध
महिलांना प्रवेश नाही, अशी धर्मस्थळे असतात, याची आपल्याला माहिती आहे. केरळच्या साबरीमला मंदिरात विशिष्ट वयोगटातील महिलांना प्रवेश नसतो. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना प्रवेश करण्याचा अधिकार दिला असूनही परंपरेनुसार त्या आजही या मंदिरात जात नाहीत. अशी आणखी काही मंदिरेही असण्याची शक्यता आहे. तथापि, मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील एका मंदिरात पुरुषांचा प्रवेश निषिद्ध मानला गेला आहे. त्यामुळे या मंदिरात केवळ महिलांचेचे राज्य आहे.
या मंदिराची निर्मिती हिंदू धर्मातील स्वामीनारायण सांप्रदायाकडून झाली आहे. या मंदिरात महिला पूजन, भजन, अनुष्ठान आणि ध्यानधारणा करु शकतात. या मंदिरात पुरुष मात्र कोणत्याही कारणास्तव प्रवेश करु शकत नाहीत. सकाळी आणि सायंकाळी येथे मोठ्या संख्येने महिला उपस्थित असतात. यामुळे या मंदिराला ‘भगिनींचे मंदीर’ असे नामोनिधान प्राप्त झाले आहे. या मंदिराचे व्यवस्थापनही अर्थातच महिलाच सांभाळतात. तसे हे मंदीर जुने नाही. केवळ 10 वर्षांपूर्वी याची निर्मिती करण्यात आली आहे. महिलांना मुक्तपणे पूजाआर्चा करता यावी, यासाठीच या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिराच्या एका व्यवस्थापिका शारदा शाह या देतात. महिला या मंदिरात अधिक सुरक्षितपणे धार्मिक कार्ये करु शकतात. या मंदिराचा आकार एकावेळी 200 महिला बसू शकतील, इतका आहे. या उपक्रमाला महिलांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने भारतात अन्यत्रही तो साकारण्याची शक्यता आहे. सध्या मध्यप्रदेशात केवळ महिलांसाठी असणारे हे एकच मंदीर आहे, अशी माहिती दिली जाते. येथे दूरच्या गावांहूनही महिला येण्याचे प्रमाण आता वाढले आहे.