For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय क्रिकेटमधील संस्मरणीय विजय

06:01 AM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारतीय क्रिकेटमधील संस्मरणीय विजय
Advertisement

भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की विश्वचषक स्पर्धेत तुम्ही पाकिस्तानला हरवा, भलेही तुम्ही उपविजेतेपदावर समाधान माना. किंबहुना भारतीय क्रिकेटमध्ये हा अलिखित नियमच आहे. आता त्याच पाकिस्तानची जागा कांगारूनड घेतलीय. (सध्या तरी पाकिस्तान क्रिकेटची अवस्था क्लब दर्जाच्या क्रिकेटपेक्षाही खालच्या दर्जाची आहे) अर्थात हा संघच असा आहे की ज्याने क्रिकेटमध्ये ‘मी म्हणेन तेच तोरण आणि मी म्हणेन तेच धोरण,’ अशीच कामगिरी केली आहे. मागील 25 वर्षात पुरुष अथवा महिला क्रिकेटचे भारतीय संघाचे उत्कंठावर्धक विजय मी बघितले. परंतु कालचा कांगारूविरुद्धचा हा विजय वर्षानुवर्षे भारतीय क्रिकेट रसिकांच्या हृदयात कोरला जाईल. सामना सुरू होण्यापूर्वी प्रतीका रावल आपल्या संघात नाही, हे संकट ‘आ’ वासून उभे ठाकले होते. त्यातच  50 षटकात कांगारूंनी 338 धावा कुटल्यानंतर हे संकट अधिक गडद झाले होते. परंतु याच संकटाला भारतीय संघ धीरोदात्तपणे सामोरे जात जो विजय मिळवला, त्या विजयाला लाख लाख सलाम!

Advertisement

ऐन मोक्याच्या क्षणी पराभव काय असतो, हे खूप वेळा भारतीय संघाने अनुभवलंय. किंबहुना मी तर असे म्हणेन की असे पराभव भारताच्या पाचवीलाच पुजले आहेत. अगदी जावेद मियांदादच्या त्या षटकारापासून ते काल-परवापर्यंतच्या झटपट क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यापर्यंत. परंतु धावांचा पाठलाग करताना योग्य नियोजन, आक्रमक फटकेबाजीला क्रिकेटच्या कलात्मक फटक्यांची जोड आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना डोईजड होऊ न देणे, या त्रिसूत्रीचा वापर करत पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाचा विजय याची देही याची डोळा हिसकावून घेतला. सर्व कसं ऑस्ट्रेलियन संघाला स्वप्नवत वाटणारं. बाद फेरीतील विजय हा त्यांच्या हातातून निसटत होता आणि ते हतबलतेने बघत होते.

भारतीय संघाने कांगारूंच्या अॅग्रेशनला अॅग्रेशनने उत्तर दिले. याचेच रूपांतर क्रिकेटच्या भाषेतील लॉलीपॉप झेल सोडण्यात झालं. त्याचं पूर्ण श्रेय जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर यांना द्यावंच लागेल. आधीच्या लेखात मी म्हटलं होतं की झोपी गेलेली हरमनप्रीत कौर नावाची वाघीण जागी झाली पाहिजे. आणि नेमकं तसंच घडलं. या दोन्ही खेळाडूंनी कांगारूंचा अक्षरश: फडशा पाडला. हरमनप्रीत कौरचा एक्स्ट्राकव्हरच्या डोक्यावरून मॅकग्राला ठोकलेला षटकार केवळ अप्रतिम होता. क्रिकेटमध्ये प्रमोशन मिळाल्यानंतर त्याचा फायदा कसा उठवावा हे तुम्ही रवी शास्त्राr गुरुजींना विचारा. (फलंदाजीत त्यांनी सर्व नंबरवर फलंदाजी केली आहे). काल जेमिमा रॉड्रिग्सने तिला मिळालेल्या प्रमोशनचं सोनं केलं. महिला विश्वचषक म्हटलं की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया असं समीकरण रहायचं. परंतु दोन दिवसांपूर्वी आफ्रिकेने इंग्लंडला हरवलं तर काल जगज्जेता कांगारूंना हरवत काही प्रमाणात का होईना, महिला झटपट क्रिकेटमधील त्यांची मत्तेदारी संपवली.

Advertisement

सध्या पुरुषांच्या भारतीय क्रिकेटमध्ये पंजाब आणि मुंबई खेळाडूंचा दबदबा आहे. नेमकी तीच गोष्ट भारतीय महिला क्रिकेटमध्ये. पंजाबच्या हरमनप्रीत कौरने आणि मुंबईच्या जेमिमाने मिळून दिलेला हा विजय भारतीय क्रिकेटमध्ये शोले चित्रपटासारखाच स्मरणात राहील. डगआऊटमधील सपोर्ट स्टाफचं कौतुक करावं लागेल. ज्यांनी जेमिमा आणि सातव्या नंबरवर येणाऱ्या दीप्तीला बढती देऊन संघाचा ऐतिहासिक विजय सुकर केला. पूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ 24 कॅरेट सोनं घेऊन अंगावर मिरवत होता. परंतु ऐन मोक्याच्या सामन्यात या सोन्याचे रूपांतर बेन्टेक्समध्ये कधी झालं, हे ऑस्ट्रेलिया संघाला समजलेच नाही. असो. पुन्हा एकदा भारतीय संघाचे अभिनंदन!

उपांत्य फेरीतील आक्रमणाची धार अंतिम सामन्यात कायम राहो हीच माफक अपेक्षा. बऱ्याच वर्षापासून ऑस्ट्रेलियन महिला संघ झटपट क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत विजयाच्या गादीवर विराजमान झाली होती. ती गादी काल चार वर्षांसाठी खालसा झाली. भारतात राजकारण म्हटलं की उत्तर प्रदेश आणि क्रिकेट म्हटलं की मुंबई, असं जणू समीकरणच बनले आहे. एक वर्षांपूर्वी रोहित शर्मा तर काही महिन्यांपूर्वी सूर्यकुमार यादव आणि आता जेमिमाच्या रूपात भारतीय क्रिकेटमधील मुंबईचे स्थान अधोरेखित केलं. असो. जी गोष्ट मिताली राजला जमली नाही ती गोष्ट हरमनप्रीत साध्य करण्यास सज्ज झाली आहे. तूर्तास तरी आपण रोमहर्षक विजयाचा आनंद घेऊया !

-विजय बागायतकर

Advertisement
Tags :

.