राज्य समगार (चर्मकार) संघाच्या सदस्यत्व नोंदणीला प्रारंभ
बेळगाव : कर्नाटक राज्य समगार (चर्मकार) हरळय्या संघ, नगरभावी, बेंगळूर या संघाच्या सदस्यत्व नोंदणीला बेळगावमध्ये प्रारंभ करण्यात आला. संघाचे राज्याध्यक्ष जगदीश बेटगेरी यांच्या उपस्थितीत बॅ. नाथ पै चौक शहापूर येथील मारुती देवस्थानमध्ये सदस्यत्व नोंदणी सुरू करण्यात आली. शहर महामंडळाध्यक्ष रवी शिंदे यांच्याकडे यावेळी सदस्यत्व नोंदणी अर्ज सुपूर्द करण्यात आले. तसेच समगार हरळय्या समाजाच्या विकासासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन करण्यात आले. संघाचे उपाध्यक्ष परशुराम अरकेरी, बी. आर. कट्टीमनी, यल्लाप्पा भेंडीगेरी, राज्य प्रधान सचिव सुनील मदनभावी, प्रेमा भंडारी, यल्लाप्पा सन्नक्यान्नवर यांची यावेळी भाषणे झाली. 20 लाख संख्या असणाऱ्या समगार हरळय्या समाजाने प्रत्येक निगम, महामंडळात सामावून घेण्याची मागणी सरकारकडे केल्याचे जगदीश बेटगेरी यांनी सांगितले.
...तर तीव्र आंदोलनाचा इशारा
सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. याप्रसंगी सरोजा संपगाव, चंद्रकांत चव्हाण, शशिकांत निपाणीकर, शिवराज सौदागर, हनुमंत जाधव, संतोष होंगल, समाजातील मान्यवर, युवक व समाजबांधव उपस्थित होते. किशोर पवार यांनी सूत्रसंचालन केले. श्रीपाद बेटगेरी यांनी आभार मानले.