For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेली केर, बेथ मुनी, खाका यांना मासिक पुरस्कारासाठी नामांकन

06:44 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेली केर  बेथ मुनी  खाका यांना मासिक पुरस्कारासाठी नामांकन
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

2026 मार्च महिन्यातील आयसीसीच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी न्यूझीलंडची मेली केर, ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी आणि द. आफ्रिकेची आयाबोंगा खाका यांना नामांकन मिळाले आहे.

मार्च महिन्यात झालेल्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडची कर्णधार मेली केरने अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडविले. घरच्या मैदानावर झालेल्या झिम्बाब्वे आणि द. आफ्रिका विरुद्धच्या चार वनडे आणि सहा टी-20 सामन्यांच्या मालिकेत केरने दर्जेदार कामगिरी केली. आयसीसीच्या महिलांच्या टी-20 अष्टपैलूंया मानांकनात सध्या मेली केर ही अग्रस्थानावर आहे. केरने चार वनडे सामन्यात 6.77 धावांच्या सरासरीने 18 गडी बाद केले आहेत. झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात तिने 34 धावांत 7 गडी बाद केले होते. न्यूझीलंडतर्फे महिलांच्या वनडे क्रिकेट प्रकारात मेली केरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच तिने टी-20 प्रकारात सहा सामन्यात सहा गडी बाद केले. कर्णधार केरने टी-20 मालिकेत फलंदाजीत 276 धावा झळकविल्या. त्यामुळे न्यूझीलंडने या मालिकेत द. आफ्रिकेचा 4-1 असा पराभव केला. वनडे प्रकारात तिने 176 धावा जमविल्या.

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने मार्च महिन्यात झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेतील एका सामन्यात 84 चेंडूत नाबाद 106 धावा झळकविल्याने ऑस्ट्रेलियन महिला संघाने या मालिकेतील शेवटचा वनडे सामना 185 धावांनी जिंकून मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. त्याचप्रमाणे विंडीज विरुद्धच्या टी-20 मालिकेत मुनीने 35.66 धावांच्या सरासरीने 107 धावा जमविल्या. तसेच विंडीजविरुद्धच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळविला. या सामन्यात मुनीने 65 धावा जमविल्या होत्या.

द. आफ्रिकेच्या खाकाने न्यूझीलंड दौऱ्यातील मालिकेत द. आफ्रिकेतर्फे टी-20 प्रकारात सर्वाधिक बळी घेतले. तिने या मालिकेत 15.37 धावांच्या सरासरीने 8 गडी बाद केले. तसेच मार्च महिन्यात झालेल्या एकमेव वनडे सामन्यात खाकाने 56 धावांत सहा गडी बाद करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. वनडे प्रकारातील खाकाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

Advertisement

.