मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक
भारताची प्रत्यार्पणाची मागणी, प्रक्रियेला प्रारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंजाब नॅशनल बँकेसह अन्य काही बँकांना 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावणारा फसवणूकखोर उद्योगपती मेहुल चोक्सी याला बेल्जियम या देशात अटक करण्यात आली आहे. तो आपली बेल्जियन पत्नी प्रीती हिच्यासह बेल्जियममध्येच रहात होता. भारताने आता त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली असून त्यादृष्टीने प्रक्रियेला प्रारंभही करण्यात आला आहे. चोक्सी याला रविवारी बेल्जियन पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले.
मेहुल चोक्सी हा हिरे व्यापारी असल्याची बतावणी करत होता. त्याने बनावट कागदपत्रे तयार करुन पंजाब नॅशनल बँक आणि अन्य काही बँकांकडून 13 हजार कोटी रुपयांहून अधिकच्या कर्जाची उचल केली होती. हा पैसा त्याने हवालाच्या माध्यमातून भारताबाहेर नेला असा आरोप आहे. हजारो कोटी रुपयांची लुबाडणूक करून तो जानेवारी 2018 मध्ये देशाबाहेर पळून गेला. चोक्सी हा आणखी एक फसवणूकखोर उद्योजक नीरव मोदी याचा मामा आहे. नीरव मोदीचाही या घोटाळ्यात हात असून तोही भारताबाहेर पळून गेला आहे.
अटकेसाठी भारताचा पुढाकार
भारताच्या प्रयत्नांमुळेच बेल्जियन सरकारने चोक्सीला अटक केली हे आता स्पष्ट होत आहे. हजारो कोटी रुपयांचा अपहार करून चोक्सी प्रथम अमेरिकेला पळून गेला होता. त्यानंतर त्याने अँटिग्वा या वेस्ट इंडिजमधील बेटावर काही वर्षे आश्रय घेतला. तेथून तो बेल्जियम या देशात स्थलांतरित झाला. तेथे तो 15 नोव्हेंबर 2023 पासून वास्तव्यास आहे. त्याने या देशात वास्तव्य करण्यासाठी ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ प्राप्त केले आहे. तो येथे पत्नीसह रहात होता.
सुगावा लागताच हालचाली
चोक्सी बेल्जियममध्ये वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त होताच भारताने आपल्या हालचालींना प्रारंभ केला होता. चोक्सी याच्या विरोधात सर्व पुरावे आणि कागदपत्रे भारताने बेल्जियमच्या सरकारला सादर केली आहेत. या कागदपत्रांच्या आधारावर त्याला आता त्या देशाच्या प्रशासनाने अटक केली असून त्याची पाठवणी कारागृहात करण्यात आली आहे. ईडीनेही त्याच्या विरोधात आता तिसरे आरोपपत्र सादर केले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रांचा उपयोग
चोक्सी याने आपल्या पत्नीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या आधारावर बेल्जियममध्ये प्रवेश मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताने ही बाब पुराव्यानिशी बेल्जियम सरकारच्या निदर्शनास आणली आहे. त्याची पत्नी बेल्जियमची नागरिक असल्याने त्याला बेल्जियम सरकारची फसवणूक करणे सोपे गेले होते. त्याला बेल्जियमने ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ दिल्याने तो युरोपातील कोणत्याही देशात स्थलांतर करु शकतो. त्यामुळे त्याला भारतात आणणे अधिक त्रासाचे होणार होते. तथापि, भारताने त्याच्या विरोधात भक्कम पुरावे सादर केल्याने त्याला बेल्जियममध्येच अटक करण्यात आली. त्यामुळे त्याचा पाठशिवणीचा खेळ आता थांबल्यात जमा आहे, असे तज्ञांचे मत आहे.
प्रत्यार्पणाला विरोध करणार
चोक्सीच्या प्रत्यार्पणाला कडाडून विरोध केला जाईल, असे प्रतिपादन त्याच्या वकिलांनी केले आहे. बेल्जियममधील संबंधित न्यायालयात त्याच्या जामिनासाठी अर्ज केला जाईल. तसेच भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी केलेल्या अर्जालाही विरोध केला जाईल. भारताच्या ताब्यात त्याला दिल्यास त्याच्या मानवाधिकारांचा भंग होण्याची शक्यता आहे. तसेच तो हृदयविकाराने त्रस्त असल्याने त्याला बेल्जियममध्येच राहू देण्यात यावे, अशी कारणे प्रत्यार्पणाच्या विरोधासाठी देण्यात आली आहेत, अशी माहिती त्याच्या बेल्जियममधील वकिलांनी दिली आहे.