मेहिदी हसन मिराजकडे हंगामी कर्णधारपद
वृत्तसंस्था/ अँटिग्वा
बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या विंडीजच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील येथे सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमूल हुसेन शांतो याला स्नायू दुखापत झाल्याने तो या मालिकेत खेळू शकणार नसल्याने क्रिकेट बांगलादेशने अष्टपैलू मेहिदी हसन मिराजकडे कर्णधारपद सोपविले आहे. आता या मालिकेत बांगलादेशचे नेतृत्व मिराज करीत आहे.
उभय संघामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. या सामन्यातील पहिल्या दिवशी विंडीजने पहिल्या डावात 5 बाद 250 धावा जमविल्या होत्या. अॅलिक अॅथनेझ आणि मिकाईल लुईस यांनी दमदार अर्धशतके झळकवली. या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा मुशफिकुर रहिम दुखापतीमुळे खेळू शकला नाही. आता जखमी शांतोच्या जागी 22 वर्षीय शहजाद हुसेनची बांगलादेश संघात बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. या दौऱ्यात उभय संघातील दोन सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्याची टी-20 मालिका आयोजित केली असून टी-20 मालिका 19 डिसेंबरला संपणार आहे.