For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेहदी हसन, दास यांनी राखले कर्णधारपद

06:18 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेहदी हसन  दास यांनी राखले कर्णधारपद
Advertisement

बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या बैठकीत निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या संचालक समितीची चौथी सर्वसाधारण बैठक येथे नुकतीच झाली. या बैठकीत बांगलादेश क्रिकेट संघाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच कर्णधारपदाचा साचा भक्कम करण्याच्या दृष्टीकोनातून निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार बांगलादेशच्या वनडे संघाचे नेतृत्व मेहदी हसन मिराझकडे तर टी-20 संघाचे नेतृत्व लिटन दासकडे कायम ठेवण्यात आले आहे.

Advertisement

बांगलादेश वनडे संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आलेल्या मेहदी हसन मिराझकडे हे पद 2027 मध्ये होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत राहिल तर 2028 साली होणाऱ्या आयसीसीच्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत लिटॉन दास बांगलादेशचे नेतृत्व करेल. बांगलादेशच्या वनडे संघाच्या उपकर्णधारपदी नजमुल हुसेन शांतो तर टी-20 संघाच्या उपकर्णधारपदी सैफ हसन यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे माजी फिरकी गोलंदाज मोहम्मद रफीकची बांगलादेश संघाच्या फिरकी गोलंदाज प्रशिक्षकपदी तसेच सल्लागारपदी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. बांगलादेश क्रिकेटच्या इतिहासामध्ये कसोटी आणि वनडे प्रकारात बळींचे शतक नोंदविणारा मोहम्मद रफीक हा बांगलादेशचा पहिला गोलंदाज आहे.

मेहदी हसन मिराजने यापूर्वी बांगलादेश वनडे संघाचे नेतृत्व करताना 2025 च्या क्रिकेट हंगामात विंडीजचा पराभव केला होता. तसेच त्यानंतर त्यांनी चालू वर्षीच्या प्रारंभी झालेल्या मालिकेत पाकवर विजय मिळविला होता. बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या संचालक कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये अन्य काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. क्रीडा पत्रकारांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रमाची अंमलबजावणी पहिल्यांदाच करण्यात येणार आहे. तसेच बांगलादेश क्रिकेट मंडळातर्फे प्रत्येक वर्षी खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेऊन वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रम नव्याने सुरु केला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.