स्पोर्ट्स mania
महिला क्रिकेटची ‘मेगास्टार’...मेगन लॅनिंग !
मेगन लॅनिंग हे नाव नुकतंच गाजलं ते तिच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघानं ‘टी20 विश्वचषक पटकावल्यानं...आंतरराष्ट्रीय स्तरावर 20 डिसेंबर, 2010 रोजी पदार्पण केल्यानंतरच्या लॅनिंगच्या शानदार कारकिर्दीवरून नजर फिरविल्यास तिचा जन्म जणू क्रिकेट खेळण्यासाठी अन् स्पर्धा जिंकण्यासाठीच झालाय असं वाटणं स्वाभाविक... मेगन उर्फ मेग लॅनिंग...धडाकेबाज फलंदाज अन् तितकीच कुशल ऑस्ट्रेलियाच्या जगज्जेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार..तिनं बजावलेले पराक्रम अन् तिच्या नेतृत्वाखाली संघानं घेतलेली जबरदस्त भरारी पाहता तिला ‘महिला क्रिकेटमधली रिकी पाँटिंग’ असं म्हणण्याचा मोह अनेकांना अनावर होईल. पाँटिंग हाच तिचा आदर्श, तरीही असं म्हणणं बरोबर नव्हे. कारण लॅनिंगनं आपलं वेगळं अस्तित्व पुरेपूर सिद्ध केलंय...
महिला क्रिकेटमधील ‘मेगास्टार’ म्हणता येणाऱया मेग लॅनिंगचा जन्म 25 मार्च, 1992 रोजी झाला तो क्रिकेटचा काहीही इतिहास नसलेल्या सिंगापूरमध्ये. त्यानंतर तिचं कुटुंब सिडनीत स्थलांतरित झालं. लॅनिंगनं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली ती तिथंच. देशांतर्गत आणखी एक स्थलांतर घडल्यानंतर वयाच्या 14 व्या वर्षी मुलांच्या ‘असोसिएटेड पब्लिक स्कूल संघा’तून क्रिकेट खेळणारी ऑस्ट्रेलियातील पहिली मुलगी बनल्यानं तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली... 2008 मध्ये व्हिक्टोरियातर्फे पदार्पण केलेल्या लॅनिंगची वाटचाल पुढची दोन-तीन वर्षं फारशी उल्लेखनीय राहिली नाही. हे चित्र बदललं ते 2010-11 मोसमापासून. त्या वर्षीच्या ‘महिला राष्ट्रीय क्रिकेट लीग’मध्ये तिनं पहिल्या शतकाची नोंद करताना 123 चेंडूंत 127 धावांची खेळी केली. फलंदाजीतील हा दबदबा पुढं इतका वाढत गेला की, विजेत्या संघातून न झळकताही मेगननं विक्रमी सहा वेळा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला...नोव्हेंबर, 2012 मध्ये तिनं 175 धावा काढून सदर लीगमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. पण तो टिकला केवळ आठ दिवस. खुद्द लॅनिंगनंच 241 धावांची खेळी करून नव्या उच्चांकाची नोंद केली अन् हा विक्रम देखील काही हंगामांनंतर तिनंच मोडला तो 244 धावा कुटून...
देशांतर्गत भरभरून धावा जमवणं वेगळं अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणं वेगळं. पण तिथं देखील दर्शन घडलं ते त्याच चित्राचं...फलंदाजीत यशस्वी मेगनं कर्णधारपदाचं आव्हान सुद्धा तितक्याच समर्थपणे पेललं. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाची कर्णधार बनल्यानंतर तिनं मागं वळून पाहिलेलं नाही...कोणत्याही खेळाडूचं करिअर दुखापतीमुक्त नसतं. लॅनिंग 2017 च्या विश्वचषक स्पर्धेत उतरली तेव्हा तिच्या तंदुरुस्तीविषयी शंका होती. श्रीलंकेविरुद्ध नाबाद 152 धावांच्या खेळीनं ती चिंता तात्पुरती दूर केली असली, तरी स्पर्धेचा समारोप झाल्यावर तिच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर मेग सहा ते आठ महिने मैदानात परतू शकणार नाही असा होरा होता... पण लॅनिंग नुसती दणक्यात परतलीच नाही, तर त्यानंतर तिनं फलंदाजीत अन् कर्णधार या नात्यानं सुद्धा कित्येक विक्रम रचले, ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर आणखी अनेक विजेतेपदं जमा केली...2020 च्या ‘टी20’ विश्वचषक स्पर्धेच्या शुभारंभी सामन्यातच ऑस्ट्रेलियाला तरुण भारतीय चमूसमोर पराभवाचा सामना करावा लागल्यावर खचून न जाता लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघानं भारताचं आव्हान अंतिम फेरीत मोडीत काढत चषक उचलला. त्यासरशी लीन लार्सन नि मायकेल क्लार्क यांच्यानंतर मायदेशात विश्वचषक जिंकणारी ती तिसरी ऑस्ट्रेलियन कर्णधार बनली... त्याला पुढं जोड मिळाली ती ‘कॉमनवेल्थ खेळां’त पटकावलेल्या पहिल्या सुवर्णपदकाची, गेल्या वर्षी जिंकलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेची अन् आता ‘टी20’ किताबाची...मेगन लॅनिंगची संपूर्ण कारकीर्द पाहता एक गोष्ट ठळकपणे जाणवते अन् ती म्हणजे जुने विक्रम मोडीत काढण्याची व नवीन विक्रम जन्मास घालण्याची तिची विलक्षण महत्त्वाकांक्षा !
जबरदस्त नेतृत्व...
- मेगच्या नेतृत्वगुणांचा आता कस लागेल तो 4 मार्चपासून मुंबईत सुरू होणाऱया शुभारंभी ‘महिला प्रीमियर लीग’मध्ये. तिच्याकडे ‘दिल्ली कॅपिटल्स’चं अधिपत्य सोपविण्यात आलेलं असून तिला करारबद्ध करण्यात आलंय ते 1.1 कोटी रुपयांना...
- क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही पुरुष वा महिला कर्णधारानं मेग लॅनिंगइतके ‘आयसीसी विश्वचषक’ पटकावलेले नाहीत. तिनं नुकत्याच झालेल्या महिला ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेत हा टप्पा गाठला...लॅनिंगच्या संघानं दक्षिण आफ्रिकेतील या स्पर्धेत एकही सामना न गमावता सलग दुसऱयांदा विजेतेपद पटकावलं...
- कर्णधार या नात्यानं मेगनं एकूण पाच प्रमुख स्पर्धा जिंकल्याहेत. यामध्ये गेल्या वर्षीचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक अन् 2014, 2018, 2020 नि 2023 च्या ‘टी20’ विश्वचषक स्पर्धांचा समावेश होतो...या आघाडीवर तिनं मागं टाकलंय ते दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू रिकी पाँटिंगला (चार प्रमुख विजेतेपदं) अन् माजी भारतीय कर्णधार एम. एस. धोनीला (तीन किताब)...
- मेगन लॅनिंग ही इतिहासातील 100 ‘टी20’ सामन्यांत संघाचं नेतृत्व करणारी पहिली खेळाडू (पुरुष किंवा महिला) बनलीय. 96 सामन्यांनिशी तिच्या मागोमाग आहे ती भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर. पुरुष खेळाडूंमध्ये माजी फलंदाज ऍरॉन फिंचच्या नावावर हा विक्रम विसावलाय. त्यानं 76 ‘टी20’ लढतींत ऑस्ट्रेलियाचं अधिपत्य केलं...
- एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग सर्वाधिक विजय मिळवण्याचा पाँटिंगच्या अधिपत्याखालील संघानं 2003 साली नोंदविलेला विश्वविक्रम (22 सामने) मोडण्याचा पराक्रमही लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाच्या खात्यावर जमा झालाय...
- जानेवारी, 2014 मध्ये लॅनिंग ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची सर्वांत तरुण कर्णधार बनली. त्यावेळी ती 21 वर्षांची...
लॅनिंगचे पराक्रम...
- 2011 साली इंग्लंडविरुद्ध पदार्पण केल्यानंतर दुसऱयाच सामन्यात मेगनं पहिलं शतक झळकावलं तेव्हा ती 18 वर्षं आणि 288 दिवस वयानिशी ऑस्ट्रेलियाची सर्वांत तरुण शतकवीर ठरली. हा विक्रम त्यापूर्वी नावावर होता पाँटिंगच्या...
- 2012 साली न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात केवळ 45 चेंडूत शतक झळकावून सर्वांत जलद शतक फटकावणारी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू ठरण्याचा मान तिनं पटकावला...
- कोणत्याही महिला क्रिकेटपटूनं लॅनिंगपेक्षा जास्त एकदिवसीय शतकं (15) झळकावलेली नाहीत...शिवाय ‘टी20’मध्ये 3400 धावांचा टप्पा पार करणारी ती दुसरी महिला. या प्रकारात दोन शतकं झळकावणाऱया मोजक्याच फलंदाजांच्या गटात तिचा समावेश होतो...
सहा महिन्यांचा ‘ब्रेक’...कॅफेमध्ये काम !
मेगन लॅनिंगनं 2022 च्या राष्ट्रकुल खेळांत सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर ‘ब्रेक’ घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये ती अजिबात परत न येण्याची शक्यता व्यक्त करणाऱया बातम्या अनेक वेळा झळकल्या. परंतु 30 वर्षांच्या या खेळाडूनं जास्त वर्चस्व गाजवण्याच्या इच्छेसह दणक्यात पुनरागमन केलं...या सहा महिन्यांच्या विश्रांतीमुळं तिला इंग्लंडची ‘दि हंड्रेड’ आणि ऑस्ट्रेलियाची महिला ‘बिग बॅश लीग’ तसंच भारताच्या दौऱयातील ‘टी20’ सामन्यांना मुकावं लागलं. पण त्याचबरोबर तिला ताजंतवानं आणि ‘रिसेट’ करण्यास त्याची मोलाची मदत झाली...या कालावधीत लॅनिंग स्थानिक कॅफेमध्ये काम करताना ग्राहकांना पदार्थ आणून देणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, भांडी धुणं यात रमली. शिवाय तिनं युरोपभर प्रवास केला अन् मित्र, कुटुंबीय तसंच आपला प्रिय कुत्रा ‘मेबेल’समवेत वेळ घालविला...
मेगचा आवडता ‘डाएट’...
भूकेचं प्रमाण, सोय आणि स्थान यावर लॅनिंगचा फराळ अवलंबून असतो अन् त्यात स्थान मिळतं ते तिच्या आवडत्या मुस्ली, योगर्टसह स्मुदी, डार्क चॉकलेट, कॉफी अन् ‘पिनट बटर’ वा केळय़ांसह टोस्ट यांना...कॉफी घेतल्यानंतर लॅनिंग तिच्या दिवसाची सुरुवात ज्या नाश्त्यानं करते त्यात सामान्यतः टोस्टवर अंडी वा ऍव्होकाडो याचा अंतर्भाव असतो...दुपारी 3 पर्यंत केळे, ब्ल्यूबेरी, त्यात काही प्रमाणात प्रोटिन पावडर, दूध आणि ‘पिनट बटर’ असा पुन्हा फराळ...‘मला माझी कॉफी आवडते आणि दिवसातून तीन वेळा तरी मी कॉफी घेते’, असं ती सांगते...
- राजू प्रभू