तेजस विमानांसाठी ‘मेगा’ करार
हिंदुस्तान एरोनॉटिक्सला 97 लढाऊ विमानांची ऑर्डर : 62,370 कोटींचा व्यवहार,भारतीय हवाई दलाची ताकद दुप्पट होणार,निवृत्त होणाऱ्या ‘मिग-21’ची जागा घेणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली, हैदराबाद
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) भारतीय हवाई दलासाठी 97 मार्क-1ए हलके लढाऊ विमान (तेजस लढाऊ विमाने) तयार करण्याचे कंत्राट दिले. केंद्राने ‘एचएएल’सोबत 62,370 कोटींचा करार केला आहे. तेजस लढाऊ विमानांसाठी ‘एचएएल’ला मिळालेली ही दुसरी ऑर्डर आहे. यापूर्वी, केंद्राने फेब्रुवारी 2021 मध्ये 46,898 कोटी रुपयांच्या करारांतर्गत 83 मार्क-1ए विमानांची ऑर्डर दिली होती. कंपनीला त्यांचा पुरवठा करण्यासाठी 2028 पर्यंत वेळ देण्यात आलेली आहे.
मार्क-1ए विमान हवाई दलाच्या मिग-21 ताफ्याची जागा घेईल. या तेजस विमानांना पाकिस्तान सीमेजवळील राजस्थानमधील बिकानेर येथील नल एअरबेसवर तैनात करण्याचे नियोजन आहे. मिग-21 विमाने 26 सप्टेंबर रोजी हवाई दलातून निवृत्त होणार आहेत. या विमानांनी 62 वर्षांच्या सेवेत अनेक प्रमुख युद्ध मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्यांची जागा नव्याने दाखल होणारी तेजस विमाने घेणार आहेत.
अपग्रेडेड एव्हिओनिक्स व रडार सिस्टम
केंद्र सरकारने 97 तेजस लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 19 ऑगस्ट रोजी 62,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. या जेटमध्ये 64 टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह स्व-संरक्षण कवच आणि नियंत्रण अॅक्च्युएटर असतील. तसेच 67 नवीन स्वदेशी घटक असतील. मार्क-1ए ही सिंगल-इंजिन तेजस विमानाची प्रगत आवृत्ती आहे. हे चौथ्या पिढीतील हलके लढाऊ विमान असून कमी वजन असूनही ते अत्यंत चपळ आहे. त्यात अपग्रेडेड एव्हिओनिक्स आणि रडार सिस्टम आहेत.
स्वदेशी बनावटीवर भर
तेजस मार्क-1ए चे बहुतांश भाग भारतात तयार केले जातात. तेजसची जुनी आवृत्ती एचएएलने विकसित केली होती. हे विमान विमान विकास संस्था (एडीए) आणि डीआरडीओच्या मदतीने बांधण्यात आले आहे. ते हवाई, समुद्र आणि जमिनीवरील हल्ल्यांसाठी डिझाइन केलेले आहे. ते कठीण परिस्थितीतही लक्ष्यांवर मारा करू शकते.
1983 पासून ‘तेजस’चा प्रवास सुरू
एलसीए तेजस कार्यक्रम 1980 च्या दशकात सुरू झाला. 1983 मध्ये भारत सरकारने हा प्रकल्प वैमानिक विकास संस्थेला (एडीए) सोपवला. त्याचा उद्देश जुन्या रशियन मिग-21 ला बदलणे हा होता. पहिले उड्डाण 2001 मध्ये झाले. 2003 मध्ये त्याचे नाव ‘तेजस’ ठेवण्यात आले. संस्कृतमध्ये त्याचा अर्थ ‘तेजस्वी’ किंवा ‘चमकदार’ असा होतो. भारतीय हवाई दलाला 2015 मध्ये पहिले उत्पादन मॉडेल मिळाले. पहिले ऑपरेशनल तेजस 2016 मध्ये देण्यात आले. तथापि, तंत्रज्ञानाच्या आव्हानांमुळे आणि निधीमुळे विलंब झाला. तरीही, भारतीय शास्त्रज्ञांनी एव्हियोनिक्स आणि रडार स्वत: विकसित केले. सद्यस्थितीत तेजस हे बहुउद्देशीय लढाऊ विमान असून ते हवेतून-हवेत, हवेतून-जमिनीवर आणि गुप्तचर मोहिमांमध्ये मारा करण्यास सक्षम आहे.
पंतप्रधान मोदींचेही तेजसमधून उड्डाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 नोव्हेंबर 2022 रोजी बेंगळूरमध्ये तेजस लढाऊ विमान उडवले. भारतीय पंतप्रधानांनी लढाऊ विमानातून केलेले हे पहिलेच उड्डाण होते. तेजस उड्डाण करण्यापूर्वी मोदींनी बेंगळूरमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयालाही भेट दिली होती.