आंतरराष्ट्रीय शाहू स्मारकासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक
उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधानसभेत ग्वाही : आमदार जयश्री जाधव यांची रखडलेल्या आराखड्याबाबत हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी : एक वर्षांत स्मारकाचा प्रश्न लागणार मार्गी
नागपूर प्रतिनिधी
गेली दहा वर्षे रखडलेल्या शाहू मिलच्या जागेतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाहू स्मारक उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळण्यासाठी शक्यता आहे. शाहू स्मारकासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी विधानसभेत दिली.
आमदार जयश्री जाधव यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याकडे लक्षवेधीद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. शाहू मिलच्या जागेचा सर्वांगीण विकास करावा आणि कोल्हापूर शहराच्या विकासास चालना द्यावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी यावेळी केली.
आमदार जाधव म्हणाल्या, सर्व सामान्य जनतेचे व बहुजन समाजाला नवजीवन देणारे आणि देशाला समतेचा संदेश देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणजे कोल्हापुरातील जनतेचा स्वाभिमान आहेत. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह कोल्हापुरात कारखानदारीचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी सन 1906 ला ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची उभारणी करून रचला परंतु, सद्य:स्थितीत शाहू मिल बंद अवस्थेत आहे. शाहू मिल जागेचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.
शाहू मिलची जागा वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे. शाहू मिलचा सर्वांगीण विकास करताना, ही जागा कोल्हापूर महानगरपालिकेस हस्तांतरित करणे गरजेचे आहे. यामुळे जमिनीच्या हस्तांतरणाची सध्याची वस्तुस्थिती काय आहे ? तसेच स्मारकासाठी नि:शुल्क जमीन कोल्हापूर महानगरपालिकेला किती दिवसात देण्यात येणार ? शाहू मिलच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी सरकारने अनेकदा निधी देण्याची फक्त घोषणा केली पण प्रत्यक्षात कोणतीही मदत केलेली नाही. यामुळे शाहू मिल आराखड्याला शासन किती निधीची तरतूद करणार? आणि स्मारकाचा आराखडा किती दिवसात पूर्ण करणार ? तसेच शाहू मिल आराखड्यास विलंबाची कारणे कोणती? असून, त्यास जबाबदार असणाऱ्यांच्या किंवा हलगर्जीपना करणाऱ्या स्थानिक प्रशासनावर कारवाई करणार का ? असे प्रश्न आमदार जयश्री जाधव यांनी विधानसभेतील कामकाजादरम्यान उपस्थित केले.
राज्यात सरकारे येतात- जातात, सत्ताबदल व पक्षबदल करून अनेकदा सरकारे पाडलेही जातात त्याबरोबर प्रशासन ही बदलते. मात्र गट -तट विसरून कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियोजित शाहू स्मारकाचा विकास आराखडा साकारण्यासाठी, छत्रपती शाहू महाराजांचे विचार स्मारकाच्या माध्यमातून जिंवत ठेवण्यासाठी, कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शाहू मिल मध्ये उभारणे गरजेचे आहे. यामुळे राजर्षी शाहू महाराज यांच्या यथोचित स्मारकासाठी शाहू मिल विकास आराखड्यातील सर्व अडथळे दूर करून, शासनाने तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली.
आमदार जाधव यांच्या लक्षवेधीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मंत्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक केले जाणार याबाबत ग्वाही दिली आहे. आवश्यकतेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. हे सरकार शाहू महाराजांचा वारसा घेऊन चालत आहे, त्यामुळे शाहू स्मारकाला जाणीवपूर्वक दिरंगाई करण्याचा प्रश्नच येत नाही. शाहू मिलची जमीन वस्त्र उद्योग विभागाच्या ताब्यात आहे. या शाहू मिलच्या 167 कोटीच्या आराखड्यास 2013 मध्ये मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे वस्त्र उद्योग विभागाची जमीन ताब्यात घेणे व काम सुरू करणे हे महत्त्वाचे आहे. सरकार स्मारक पूर्ण करणार हे निश्चित आहे आणि यासाठी वस्त्रोद्योग विभागाची जमीन पैसे घेऊन द्यायची की, पैसे न घेऊन द्यायची हा सरकारचा प्रश्न आहे आणि याबाबतचा तातडीचा निर्णय सरकार नक्की करेल व येत्या वर्षभरात स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
2014 च्या अधिवेशनात के. पी. पाटील यांचा ठराव अन् ....
2014 साली पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्य विधिमंडळाया अधिवेशनात राष्ट्रवादीचे तत्कालिन आमदार के. पी. पाटील यांनी शाहू मिलच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाहू स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करणारा ठराव मांडला होता. सभागृहाने तो सर्वानुमते मंजूरही केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील विविध आमदार, मंत्र्यांनी सरकारला ठरावाची आठवण करून दिली. मात्र या ठरावाला तब्बल 9 वर्षे लोटली तरीही शाहू स्मारक उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळालेली नाही. मात्र यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार जयश्री जाधव यांनी पुढाकार घेत पुन्हा शाहू स्मारकचा मुद्द्यावरून राज्य सरकारला भूमिका जाहीर करण्यास भाग पाडले आहे.
अनमोल ठेवा जतन होण्याच्या आशा पल्लवित
शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणीसंदर्भात आमदार जयश्री जाधव यांच्या लक्षवेधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्र्यांकडून ग्वाही मिळाल्याने राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा अनमोल ठेवा जतन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.