आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीचा आक्रमक पवित्रा
भूखंड वाटप प्रक्रिया रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या बैठक
दोडामार्ग – प्रतिनिधी
आडाळी एमआयडीसी तील भूखंड वाटप प्रक्रिया रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी 12 रोजी दुपारी तीन वाजता समितीने सर्वपक्षीय नेते,सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील सरपंच, पत्रकार व उद्योजक यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती सरपंच पराग गांवकर व समिती सचिव प्रवीण गांवकर यांनी दिली.आडाळी औद्योगिक क्षेत्रात उद्योजक उद्योग उभारणीसाठी उत्सुक आहेत. गेल्या दोन वर्षात सुमारे पन्नासहून अधिक उद्योजकांनी आडाळीत भूखंड घेतले आहेत. शिवाय शेकडो उद्योजकांना आडाळीत भूखंड हवे आहेत. ज्या उद्योजकांनी भूखंड घेतले आहेत, त्यांना बांधकाम आराखड्यास मंजुरी देण्यास महामंडळ प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. अद्यापही ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी विंडो ओपन केली जात नाही. अनेक उद्योजक प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून कंटाळले आहेत. त्यांनी आपली नाराजी उघड केली असून आमची गुंतवणूक ब्लॉक झाल्याने पश्चाताप होतोय अशी उद्विग्नता व्यक्त करत आहे. मात्र प्रशासनकडून कोणत्याही सकारात्मक प्रतिसाद दिला जात नाही. तसेच ज्या उद्योजकांना भूखंड हवे आहेत त्यांच्यासाठीची प्रक्रिया थांबविली आहे. भूखंड चा पूर्ण मोबदला भरणा करून देखील सहा सहा महिने भूखंड ताबा देण्यात आलेले नाहीत. महामंडळ च्या मनमानीपणामुळे उद्योजकांचे आर्थिक नुकसान होत असून आडाळी औद्योगिक क्षेत्राबाबत सुद्धा उद्योजकांमध्ये नकारात्मकता वाढत आहे. ही जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या व रोजगार निर्मितीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. त्यामुळे एमआयडीसी च्या विकासासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या कृती समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्योजकांची परेड घडवून आणून त्यांची होणारी अडवणूक व औद्योगिक विकासाला खीळ घालण्याचे कारस्थान जिल्ह्यातील जनते पर्यंत पोहचविण्यासाठी कृती समितीने आडाळीत उद्योजक, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,तालुक्यातील सरपंच, रोजगाराच्या शोधात असलेले युवक , पत्रकार यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन केले आहे. रविवारी दुपारी 3 वाजता बैठक होणार असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन समिती अध्यक्ष तथा आडाळी सरपंच पराग गांवकर व सचिव प्रवीण गांवकर यांनी केले आहे.