For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ऊसदराचा तिढा सोडविण्यासाठी आज बैठक

08:05 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऊसदराचा तिढा सोडविण्यासाठी आज बैठक
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करणार : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आश्वासन

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनिश्चितीचा तिढा सोडविण्यासाठी मंगळवार दि. 3 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात येईल. ऊसदराचा प्रश्न, कारखान्यांचा गाळप हंगाम व शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.

Advertisement

उसाला योग्य व समाधानकारक भाव मिळावा, या मागणीसाठी सोमवारी शेतकऱ्यांनी कुवेंपूनगर येथील मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या व अडचणी जाणून घेतल्या. गळीत हंगामाची वेळ जवळ आली असतानाही दर निश्चितीचा प्रश्न अद्याप मार्गी न लागल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ऊस तोडणीसाठी तयार असताना दराबाबत स्पष्टता नसल्याने आर्थिक नियोजन करणेही शेतकऱ्यांना कठीण जात आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हस्तक्षेप करून योग्य दर निश्चित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

यावेळी मंत्री जारकीहोळी म्हणाले, यापूर्वी मुख्यमंत्री बेळगाव दौऱ्यावर आले असताना ऊसदराबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी दर निश्चित करून त्याबाबत लेखी स्वरुपात माहिती देण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांच्या काही मागण्या व समस्या अद्याप कायम असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी पुन्हा एकदा चर्चा करून त्यांचे म्हणणे जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतला असून कोणत्याही संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या बैठकीत सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेतले जाईल. ऊसदर निश्चितीबरोबरच गाळप हंगाम व शेतकऱ्यांच्या इतर समस्यांवरही चर्चा करण्यात येईल. सर्वांची मते जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासनही जारकीहोळी यांनी दिले.

Advertisement
Tags :

.