रेल्वे टर्मिनसबाबत भूमिका ठरवण्यासाठी २६ नोव्हेंबरला बैठक
सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिरात होणार बैठक
मळगावस्थित सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर सावंतवाडी टर्मिनसला खऱ्या अर्थाने मूर्त रूप प्राप्त व्हावे आणि प्रवाशांची गैरसोय टाळली जावी यासाठी उपाययोजनांसदर्भात नियोजन करण्यासाठी येत्या रविवार २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम वाचन मंदिर मध्ये प्रवासी, नागरिक व व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा करून पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून आठ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री तसेच पालकमंत्री यांच्या उपस्थितीत भूमिपूजन केले. त्यानंतर उद्घाटनाचा सोहळाही दिमाखात संपन्न झाला. मात्र, काही शुल्लक बदल वगळता अजूनही खऱ्या अर्थाने रेल्वे टर्मिनस साकारले गेले नसून ही घोर फसवणूक झाली आहे.
त्या संदर्भात रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सरकार, मंत्री, कोकण रेल्वे महामंडळ आदींचे वेळोवेळी लक्ष वेधले गेले मात्र त्याकडेही सपशेलपणे दुर्लक्ष करण्यात आले. केवळ एवढेच नव्हे तर नवीन गाड्या सुरू करणे दूरच मात्र यापूर्वी सुरू असलेल्या गाड्याही अन्यत्र स्थानकांमध्ये हलविण्यात आल्या. यात प्रामुख्याने राजधानी एक्सप्रेस, गरीबरथ, नागपूर अशा अनेक गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले. त्यामुळे टर्मिनस राहिले दूर मात्र आता सावंतवाडी स्थानकही नावापुरतेच राहिले आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी आणि नागरीकांना एकत्रित करून प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.सावंतवाडीवासियांनी एकदिलाने व एकजुटीने वेळीच एकत्र येऊन कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात लढा दिला पाहिजे. अलीकडेच कोकण रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने सावंतवाडीकरांना रेल्वेच तिकीट परवडत नाही म्हणून खिल्ली उडवली होती तोच प्रत्यय पुन्हा देखील घडला, ही अपमानास्पद वागणूक न कळतपणे सावंतवाडीकरांची आहे.या साठी सनदशीर तसेच कायदेशीर मार्गाने जाण्याची तयारी केली पाहिजे, या संदर्भात विचार विनिमय करून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, व सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बचाव समिती स्थापन करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांची सभा रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आयोजित केली आहे.