हिवाळी अधिवेशनासाठी आज कामकाज समितीची बैठक
पणजी : पुढील आठवड्यात होणाऱ्या गोवा राज्य हिवाळी विधानसभा अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी आज मंगळवार दि. 6 जानेवारी रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. पर्वरी येथील विधानसभा संकुलात दुपारी 12 वा. सदर बैठक सभापती गणेश गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, या अधिवेशनाकरीता 178 तारांकीत आणि 553 अतारांकीत मिळून एकूण 739 प्रश्न आल्याची माहिती विधीमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी दिली आहे. सोमवार दि. 12 ते शुक्रवार दि. 16 जानेवारी असे एकूण 5 दिवसांचे हे अधिवेशन असेल.
2026 या नवीन वर्षातील पहिलेच अधिवेशन असल्यामुळे त्याची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. शुक्रवार हा शेवटचा दिवस असून तो खासगी कामकाजासाठी राखून ठेवण्यात आला आहे. नवे सभापती गणेश गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली होणारे हे पहिलेच अधिवेशन आहे. बैठकीस मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आरजी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर, गोवा फॉरवर्डचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई व इतर सदस्य उपस्थित राहाणार आहेत. अधिवेशनात प्रश्नोत्तर तास, शून्य तास, सरकारी विधेयके, खासगी ठराव, लक्षवेधी सूचना यांचा समावेश असून अनेक ज्वलंत विषय उपस्थित होणार असल्याने सत्ताधारी - विरोधी पक्ष यांच्यात संघर्ष होणार आहे.