हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने हॉटेल व्यावसायिकांची बैठक
मनपा आयुक्त बी. शुभा यांचे मार्गदर्शन : अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती
बेळगाव : कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात बेळगावमध्ये होणार आहे. अधिवेशनासाठी येणाऱ्या महनीय व्यक्तींच्या, अधिकाऱ्यांच्या व माध्यम प्रतिनिधींच्या निवासाची सोय करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेमध्ये आज हॉटेल व्यावसायिकांची बैठक पार पडली. या बैठकीत महानगरपालिका आयुक्त बी. शुभा यांनी मार्गदर्शन केले. अधिवेशनाच्या निमित्ताने हॉटेल्सची आवश्यकता भासणार आहे. प्रामुख्याने निवासाची सोय करणे भाग आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आयुक्तांनी सांगितले. किमान 85 हॉटेल्सची गरज भासणार असून एकूण 2200 खोल्या लागतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
उद्यापर्यंत अधिवेशनाची नक्की तारीख देणार
यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी डिसेंबर महिना हा लग्नसराईचा महिना आहे. हा कालावधी आमचा सीझन असणारा महिना आहे. अशावेळी दरवेळी अधिवेशनामुळे आम्हाला खासगी स्वरुपात ग्राहकांना हॉटेल्सचे बुकींग देता येत नाही. त्यामुळे यापुढे किंवा येणारे अधिवेशनाची तारीख पुढे ढकलावी, अशी विनंती हॉटेल व्यावसायिकांनी केली. त्यावेळी उद्यापर्यंत तुम्हाला अधिवेशनाची नक्की तारीख देऊ असे आयुक्तांनी सांगितले.
किमान दर वाढवून देण्याची मागणी
अधिवेशनाच्या काळामध्ये जवळजवळ सर्व हॉटेल्स बुक होतात. परंतु दर कमी असतो. 100 रुपयांमध्ये नाष्टा देणे परवडत नाही. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर आम्ही सेवा देऊ परंतु, किमान दर वाढवून देण्याची मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली. अधिवेशनाच्या निमित्ताने जे लोक हॉटेलमध्ये राहतील त्यांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने हॉटेल व्यावसायिकांनी आतापासूनच तयारी करावी. पाणी, विद्युत पुरवठा, ड्रेनेज अशा समस्यांचे आतापासूनच निराकरण करावे. अशी सूचना यावेळी आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी केली.
व्हीटीयूचीही अधिकाऱ्यांकडून पाहणी
दरम्यान अधिवेशनाच्यावेळी अतिमहनीय व्यक्तींच्या निवासाची सोय करण्यासाठी व्हीटीयूची सुद्धा पाहणी अधिकाऱ्यांनी केली. दरवर्षी अतिमहनीय व्यक्तींची व्हीटीयूच्या अतिथीगृहाच्या विशेष कक्षामध्ये सोय केली जाते. त्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी व्हीटीयूची सुद्धा पाहणी करून आढावा घेतला.